मुंबईकरांनो, कृत्रिम तलावांना यापुढेही अशीच पसंती द्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:34 PM2023-09-28T12:34:24+5:302023-09-28T12:35:59+5:30

दीड, पाच दिवसांच्या विसर्जनाला भक्तांचा प्रतिसाद

Mumbaikars, continue to favor artificial lakes... | मुंबईकरांनो, कृत्रिम तलावांना यापुढेही अशीच पसंती द्या...

मुंबईकरांनो, कृत्रिम तलावांना यापुढेही अशीच पसंती द्या...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : कृत्रिम तलावांना मिळणारा प्रतिसाद पाहून पालिकेकडून यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव वाढविण्यात आले आहेत. यंदा मुंबईत ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था आहे. तसेच विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे आणि फिरती विसर्जन स्थळेही तयार करण्यात येणार आहेत.

मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन पार पडावे, यासाठी २००७ पासून कृत्रिम तलावांची संकल्पना राबविण्यात आली. गेल्या वर्षी १६२ कृत्रिम तलाव तयार केले होते. यंदा तलावांची संख्या वाढविण्यात आली असून, १९१ तलाव तयार करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी कृत्रिम तलावांमध्ये सुमारे ६६,१२७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. दरवर्षी कृत्रिम विसर्जन तलावाची संख्या वाढत असून, त्यात विसर्जित होणाऱ्या मूर्तींची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी यंदा ही कृत्रिम तलावांना पसंती द्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. 

यंदा ही पसंती 
  यंदा दीड दिवसांच्या एकूण २७ हजार ५६४ घरगुती गणेशमूतींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झाले. मागील वर्षी दीड दिवसांच्या २२ हजार ४१० घरगुती गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ही संख्या ५ हजार १५४ ने म्हणजेच २२.९८ टक्क्यांनी वाढली आहे.
  यंदा पाच दिवसांच्या एकूण २९ हजार ७९२ घरगुती गणेशमूर्ती, तर ५९८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या पाचव्या दिवसाच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावात घरगुती मूर्ती विसर्जनाची संख्या तब्बल १८ हजार २०६ ने अर्थात दीड पटीने वाढली आहे.

भरती, ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी
समुद्रात सकाळी ११:०० वाजता ४.५६ मीटरची भरती,  तर सायंकाळी ५:०८ वाजता ०.७३ मीटरची ओहोटी, रात्री ११:२४ वाजता ४.४८ मीटर उंचीची भरती येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यानंतर, उद्या, २९ सप्टेंबर रोजी पहाटे ५:१५ मिनिटांनी ०.५६ मीटरची ओहोटी, सकाळी ११:३७ वाजता ४.७१ मीटरची भरती,  सायंकाळी ५:४९ वाजता ०.३६ मीटरची ओहोटी असणार आहे. या भरती तसेच ओहोटी दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावे.

वर्ष    सार्वजनिक    घरगुती  
२०१८    ६५६    ५३,२७८ 
२०१९    ५८८    ३२,६२९
२०२०    ३,७३३    ६४, ३८६
२०२१    ३,५०२    ७२, ३८८ 
२०२२    १,८२२    ६१,९८५

Web Title: Mumbaikars, continue to favor artificial lakes...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.