मुंबई : एकीकडे एसी लोकल फेऱ्यांवरून सामान्य लोकल प्रवासी तापले आहेत, तर दुसरीकडे एसी लोकलची प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सात महिन्यांत एसी लोकलचे प्रवासी सातपट झाले असून, गारेगार प्रवासाला मुंबईकरांची पसंती कायम आहे.
एसी लोकलच्या तिकीट दरांत ५० टक्के कपात केल्यानंतर, उपनगरीय रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या एसी लोकलच्या प्रवासीसंख्येत मोठी वाढ झाली. शहर आणि उपनगरातील एसी वाहतूक व्यवस्थेच्या इतर साधनांच्या तुलनेत एसी लोकलने प्रवास करणे केवळ जलदच नाही, तर किफायतशीर आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये दररोजच्या सरासरी ५,९३९ प्रवासी प्रवास करत होते.
आता ऑगस्टमध्ये ४१,३३३ प्रवासी प्रवास करत आहेत. एसी लोकलचे प्रवासी प्रशांत देसाई म्हणाले की, मी बीकेसी तसेच दादर, सीएसएमटीचा नियमित प्रवासी आहे.
वाहतूककोंडीचा सामना करावा लागणाऱ्या बीकेसी रोडने प्रवास करत असे. एसी लोकल सुरू झाल्यापासून माझा प्रवास खरोखरच आरामदायी झाला आहे. वाहतूककोंडीमध्ये वाया जाणारा वेळ लक्षात घेता एसी लोकलला प्राधान्य देतो. तसेच, रस्त्याने प्रवास करण्याच्या तुलनेत एसी लोकल तिकीट वाजवी आणि परवडणारे आहे.
मी गेली ३३ वर्षे डोंबिवली ते सीएसएमटी दरम्यान लोकल ट्रेनमधून प्रवास करीत आहे. तरी एसी लोकलमध्ये स्थलांतरित झाल्यापासून प्रवासाचा ताण पूर्णपणे कमी झाला आहे. कारण, डोंबिवली स्थानकातून उतरणे किती अवघड आहे, हे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत मध्य रेल्वेने सुरू केलेली वातानुकूलित लोकल ही आमच्या दैनंदिन प्रवासासाठी एक भेट आहे.- बबिता गोसावी, प्रवासी