Join us

मुंबईकरांचा दिवस उष्ण; कमाल तापमान ३८ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे. परिणामी मुंबईचे कमाल तापमान चढू लागले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे. परिणामी मुंबईचे कमाल तापमान चढू लागले आहे. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. चालू हंगामातील कमाल तापमानाचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. भविष्यात कमाल तापमान असेच वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर केरळ ते उत्तर मध्य महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा आता कोमोरीन क्षेत्र ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रावर चक्रिय चक्रवात आता विरुन गेले आहे. गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले.

विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागात तर कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

* महाराष्ट्र तापला

पुणे, जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ येथील कमाल तापमानाचा पारा ३६ अंशाच्या पार गेला असून, १७ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

* उकाड्यामुळे घामाघूम

अरबी समुद्राहून मुंबईच्या दिशेने जे वारे वाहतात; ते वारे स्थिर होण्यास दुपार होते आहे. दुपारी उशिरा हे वारे स्थिर होत असतानाच ते तापत आहेत. या तप्त वाऱ्यांमुळे मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होते आहे. दुसरीकडे याच काळात आर्द्रता २० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत असून, कोरडे वारे यात भर घालत आहेत. परिणामी मुंबईकरांचा दिवस उष्ण होत असून ते घामाघूम हाेत आहेत.