कोरोनाच्या धास्तीने मुंबईकरांची ‘विमानवारी’ला नापसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:06 AM2021-05-16T04:06:46+5:302021-05-16T04:06:46+5:30
नव्या निर्बंधांचाही परिणाम; दैनंदिन प्रवासी संख्येचा आलेख घसरणीला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रवाशांची वर्दळ, विमानांची लगबग आणि सतत ...
नव्या निर्बंधांचाही परिणाम; दैनंदिन प्रवासी संख्येचा आलेख घसरणीला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवाशांची वर्दळ, विमानांची लगबग आणि सतत कानावर पडणाऱ्या सूचनांनी गजबजून जाणारे मुंबई विमानतळ सध्या चिरनीद्र अवस्थेत असल्यासारखे भासत आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात येथील दैनंदिन प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने मुंबईकर विमानवारीला नापसंती दर्शवित आहेत की काय, अशी शंका विमान कंपन्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोनाआधी मुंबई विमानतळावरून दिवसाला सरासरी १ लाख ४० हजार प्रवासी प्रवास करायचे. मात्र, गेल्या मार्च महिन्यात हवाई वाहतुकीवर निर्बंध लागू केल्यापासून प्रवासी संख्येचा आलेख घसरणीला लागला आहे. मे (२०२१) महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात येथील दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी १७ हजार ६०० इतकी नोंदविण्यात आली आहे. कोरोनापूर्वकाळाचा विचार करता ही घट जवळपास ९० टक्के इतकी आहे.
जानेवारी २०२१ मध्ये मुंबई विमानतळावरील दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी ५५ हजार ८०० इतकी नोंदविण्यात आली होती. फेब्रुवारीत ६३ हजार ५००, मार्च ५० हजार ९०० आणि एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी ३४ हजार ६०० प्रवाशांनी येथून प्रवास केला. चालू वर्षाची आकडेवारी पाहता जानेवारीच्या तुलनेत मे महिन्यात मुंबई विमानतळावरील प्रवाशांची वर्दळ जवळपास ६८.४५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
* निर्बंधांची गडद सावली...
मार्च २०२१ पासून मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने टप्प्याटप्प्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले. सुरुवातीला दिल्ली, राजस्थान, गोवा, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली. आता १५ मेपासून कोणत्याही प्रवाशाला विनाअहवाल मुंबई विमानतळावर प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्बंधांच्या गडद सावलीमुळेच प्रवासी संख्येचा आलेख घसरणीला लागण्याची माहिती वाहतूक तज्ज्ञांनी दिली.
--------------------------------------