लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहरात प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत आहे, मात्र कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला जात आहे, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, असे आवाहन यंत्रणा करत आहेत. आणि नागरिकांनी गर्दी केली तर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे संकट दिसत असताना कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सर्वाधिक गरज भासली. उत्पादनापेक्षा मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट उभारले आहेत. त्यामाध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मदत होणार आहे.यंदाचा गणेशोत्सव हा गेल्यावर्षी प्रमाणेच कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी ज्या गणेश मंडळांना परवानग्या देण्यात आल्या होत्या, त्या गणेश मंडळांना यावर्षीदेखील गेल्यावर्षीच्या धर्तीवर परवानग्या देण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. तसेच कृत्रिम तलाव, श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रे इत्यादींची कार्यवाही व संख्या ही गेल्यावर्षीप्रमाणेच असणार आहे. या अनुषंगाने शासन, महानगरपालिका व पोलीस दल यांच्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे परिपूर्ण पालन करण्याचे आवाहन केले आहे.