Join us

मुंबईकरांनो, मंगळवारी पालिकेत फिरकू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 11:40 AM

जी-२० परिषदेच्या आपत्ती कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत दि. २३ ते २५ मे दरम्यान होणार आहे. शिष्टमंडळ पालिका मुख्यालयाला २३ मे रोजी भेट देणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जी-२० परिषदेच्या आपत्ती कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत दि. २३ ते २५ मे दरम्यान होणार आहे. शिष्टमंडळ पालिका मुख्यालयाला २३ मे रोजी भेट देणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कामकाजाची माहिती घेणार असून, हेरिटेज वॉकही करणार आहे. शिष्टमंडळामध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्ती असल्याने या सर्व सदस्यांच्या सुरक्षा व्यवस्था कारणास्तव मंगळवारी मुख्यालयात सकाळी ९:४५ ते ११ या वेळेत सामान्य नागरिक येऊ शकतात. मात्र, ११ नंतर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या संदर्भात मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे. बैठकीमध्ये जी-२० परिषदेचे सदस्य असलेल्या २० देशांतील सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती सहआयुक्त मिलीन सावंत यांनी दिली आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देताना या विभागांतर्गत सुरू असलेले विविध उपक्रम, उपाययोजना, यंत्रसामग्री, नियंत्रण कक्षाचे कामकाज आदींचा सदस्य अभ्यास करणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती तसेच मुंबईवर आजवर आलेल्या विविध निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित संकटांवेळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केलेली कामगिरी या शिष्टमंडळासमोर लघुचित्रफित तसेच कॉफी टेबल बुक यांच्या रूपाने सादर केली जाणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका