Join us

मुंबईकरांनो कमी पावसामुळे मे महिना कसाबसा निघणार; सात धरणांत ९० टक्के साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 12:33 PM

सात धरणांत ९० टक्के साठा, पाणीकपातीची शक्यता

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती असली तरी  मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांतील साठा सध्या ९०.३९ टक्के इतका असून, पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सध्याचा साठा हा मुंबईकरांना पुढील मे महिन्यापर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यामुळे येत्या १ ऑक्टोबरपर्यंत हे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले नसतील तर पुढच्या वर्षातील पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. पालिकेने पाणीपुरवठ्यात १ जुलैपासून १० टक्के कपातीचा निर्णय घेतला.

पाणी कपात रद्द केली

जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली. सातही तलावांची साठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून रोज मुंबईला ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या १३ लाख ८ हजार २०८ दशलक्ष लिटर म्हणजेच ९०.३९ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ९८.१५ टक्के साठा होता. 

पालिकेचे ‘वेट अँड वॉच’ 

पालिका प्रशासनाकडून येत्या १० ते १५ सप्टेंबर दरम्यान तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कपातीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. दरम्यान, पुढील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने कपातीसाठी पालिकेने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे.

टॅग्स :पाणीकपातपाऊस