मुंबईकरांच्या वीज वापराचा उच्चांक, बुधवारची सर्वाधिक मागणी गेली ३९६८ मेगावॉटवर
By सचिन लुंगसे | Published: June 1, 2023 07:09 AM2023-06-01T07:09:15+5:302023-06-01T07:09:40+5:30
उकाडा वाढल्याचा परिणाम
मुंबई : मुंबई आणि उपनगरांत सध्या प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण आहेत. कमाल तापमान सरासरी ३४ अंश असले, तरी आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने उकाडा असह्य आहे. परिणामी घरोघरी, कार्यलयांत दिवसभर पंखे, एसी आणि कुलर्स सुरू असल्याने विजेच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत तब्बल ३,९६८ मेगावॉट एवढी विजेची सर्वाधिक मागणी नोंदवण्यात आली. यंदाच्या उन्हाळ्यातील हा उच्चांक आहे.
मुंबईसोबतच ठाणे, रायगड, पालघर हे जिल्हे आणि नवी मुंबईतही विजेची मागणी प्रचंड वाढली. मात्र त्याच्या मोजणीची स्वतंत्र यंत्रणा नसल्याने त्या प्रत्येक भागात नेमकी किती मागणी वाढली, ते समजू शकलेले नाही.
मुंबईतील सर्व औद्योगिक आस्थापना, कार्यालये, घरांतील विजेचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम बुधवारी दिसून आला. यंदाच्या न्हाळ्यातील मागणीने उच्चांक नोंदवला. याआधी १९ एप्रिल रोजी साडेतीन हजार मेगावॉट विजेची मागणी नोंदवण्यात आली होती. दरम्यान, विजेची मागणी आणि पुरवठा समान असावा लागतो. किंवा त्याचा समतोल साधावा लागतो. जेवढी मागणी तेवढा पुरवठा असावा लागतो.
कशी मिळवतात वाढीव वीज?
मुंबई शहर जिल्ह्यात बेस्टकडून विजेचा पुरवठा केला जातो. टाटा आणि अदानीकडून पूर्व व पश्चिम उपनगरात विजेचा पुरवठा केला जातो. महावितरणकडून भांडूप व मुलुंड येथे विजेचा पुरवठा केला जातो.
मुंबईच्या विजेची मागणी सर्वसाधारण तीन हजार ५०० मेगावॉट एवढी नोंदविण्यात येते. त्यानुसार विजेचा पुरवठाही केला जातो. मात्र उन्हाळ्यात विजेची मागणी चार हजार मेगावॉटपर्यंत नोंदविण्यात येते.
वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी अदानीकडून डहाणू येथील पॉवर प्लांटमधून वीज घेतानाच करारानुसार इतर ठिकाणांहून वीज घेतली जाते. टाटाकडून ट्रॉम्बे प्लांटमधून विजेचा पुरवठा केला जात असून, टाटा पॉवरकडून बेस्टलाही विजेचा पुरवठा केला जातो.
अंधेरी, गोरेगाव, घाटकोपरमध्ये बत्तीगुल
अंधेरी, गोरेगाव आणि विलेपार्ले, मालाड, घाटकोपर, पवई परिसरात बुधवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला. ऐन उकाड्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांत अदानी इलेक्ट्रिसिटीकडून विजेचा पुरवठा केला जातो. गोरेगाव येथील संतोषनगर, आदर्शनगरसह लगतच्या परिसरात पावणेसहाच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. किमान अर्धा तास या परिसरात वीज नव्हती, असे येथील रहिवासी सुनील कुमरे यांनी सांगितले.
विलेपार्ले, अंधेरी येथील रहिवाशांशी संपर्क साधला असता त्यांनीही सायंकाळी अंधेरी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगितले. पश्चिम उपनगरात सर्वत्र ही अडचण आल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
लाइट का गेली?
आरे कॉलनीतील अदानीच्या वीज उपकेंद्रात २२० केव्हीच्या वीजवाहिनीत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे (ट्रिपिंग) मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वीजपुरवठा अर्धा ते पाऊण तास खंडित झाला. ४० मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे अदानी इलेक्ट्रिसिटीकडून सांगण्यात आले.