मुंबई : गेल्या काही दिवपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. कमाल तापमान सरासरी ३२ ते ३५ च्या घरात असल्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे या उन्हाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे या कडक उन्हात काम करताना नागरिकांना निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) त्रास होऊन चक्कर येण्या सारखे प्रकार घडण्याची शक्यता असल्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी येणारा उन्हाळा आरोग्याच्या अनेक समस्या घेऊन येत असतो. डिहायड्रेशन, चक्कर येणे, हाता पाय दुखणे, पोटात मळमळणे, मूत्रविकाराच्या समस्या, किडनी स्टोन, उलट्या, जुलाब या आरोग्याच्या समस्यांना नागरिक आणि लहान मुलांना सामोरे जावे लागते. अनेक नागरिकांना या तापमानाचा प्रचंड त्रास होत असतो मात्र अनेकजण त्या उन्हातही आपली नियमित कामे करत असतात. आपल्याकडे खरा उन्हाळा सुरू होतो तो म्हणजे एप्रिल पासून मात्र त्याआधीच तापमानात मोठे बदल झाल्याने नागरिकांची अंगाची लाही होत आहे. त्यामुळे मे-जून महिन्यामध्ये काही परिस्थिती अत्यंत बिकट असण्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. दुपारच्या काळात फिरणे अवघड झाले आहे.
मुंबई आद्रता मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना घाम मोठ्या प्रमाणात येतो. त्यामध्ये अनेक महिला आणि पुरुष कामाकरिता मोठा वेळ प्रवास घालवितात. ते अनेक जण लघवीला जावे लागते म्हणून जास्त पाणी पीत नाही, मात्र ते चुकीचे असून सर्वांनीच मुबलक प्रमाणात पाणी गरजेचे असते. कारण आजही आपल्याकडे चांगले सार्वजनिक शौचालये नाहीत. जी आहेत त्यामध्ये अनेक जण जायला मागत नाही कारण त्यामध्ये कमालीची अस्वच्छता असते. या अशा विदारक परिस्थितीत नागरिक आपली दिनचर्या करत असतात. मात्र शरीराला पाणी कमी मिळाल्यामुळे त्याचा पचनप्रक्रियेवर परिणाम होत असतो.
काय केले पाहिजे?
- या काळात म्हणजे २-३ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.
- नारळ, ताक, दही, लस्सीचे सेवन करावे.
- ताज्या फळाचा ज्यूस घ्यावा. फळे कापून खावीत.
- रस्त्यावरचे पाणी, सरबत शरीरासाठी हानीकारक आहे. ते पिऊ नये.
- लिंबू पाणी प्यावे. चक्कर आल्यास, ओआरएसचे पाणी प्यावे.
उन्हाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेकांना या वातावरणात फार भूक लागत नाही. त्यामुळे जेवण टाळले किंवा कमी केले जाते. विशेष म्हणजे या काळात हलका स्वरूपचा आहार नागरिकांनी घेतला पाहिजे. उन्हापासून प्रतिबंध करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. कारण कडक उन्हात नागरिकांना कधी चक्कर येईल सांगता येत नाही. त्यामुळे या काळात भरपूर पाणी प्यावे. आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने कोणतेही औषध घेऊ नका ते धोकादायक ठरू शकते. डॉ. मधुकर गायकवाड, औषधवैदक शास्त्र विभाग, जे जे रुग्णालय