मुंबईकरांच्या तोंडचं 'पाणी' पळणार? तलावांमध्ये केवळ ३४ टक्के जलसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:11 AM2019-03-14T06:11:14+5:302019-03-14T06:15:38+5:30
पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट; सायन, प्रतीक्षानगरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई
मुंबई : पावसाळ्याला आणखी तीन महिने शिल्लक असताना तलावांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. काही तलावांमधून राखीव कोट्यातील पाणी उचलून मुंबईला पुरवठा करावा लागत आहे. जेमतेम ३४ टक्के जलसाठाच शिल्लक असल्याने काही विभागांमध्ये पाणीटंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे पाणीकपातीमध्ये वाढ करण्यात आल्याचा संशय लोकप्रतिनिधी व्यक्त करीत आहेत.
परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे तलावांमध्ये १ आॅक्टोबर २०१८ रोजी १५ टक्के कमी जलसाठा जमा झाला होता. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून पालिका प्रशासनाने संपूर्ण मुंबईत सरसकट १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात नगरसेवकांकडून पाण्याच्या तक्रारी वाढल्या. अनेक विभागांमध्ये पाणी कमी दाबाने मिळत असल्याची नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांनतर हिवाळा लांबल्यामुळे पाण्याचा वापर कमी झाला. परंतु, उन्हाळा सुरू होताच पाण्याची मागणी वाढली असून तलावांमधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे.
तलावांमध्ये सध्या जेमतेम ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सायन, प्रतीक्षानगर या विभागांत पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रशासन केवळ १० टक्के पाणीकपात लागू असल्याचे सांगत असले तरी ही कपात ३० ते ४० टक्के असल्याचा संशय विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केला. तर मोहम्मद अली रोड बी विभागाच्या हद्दीतील रहिवाशांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याची नाराजी सपाचे गटनेते रईस शेख यांनी व्यक्त केली. मात्र मुंबईत १० टक्केच पाणीकपात लागू असून यात वाढ करण्यात येणार नाही, असे आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
पाण्याचे टेन्शन वाढणार
गेल्या वर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे मार्च महिन्यात तलावांमध्ये सहा लाख दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक होता. मात्र या वर्षी पाण्याची पातळी आणखी कमी झाली आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचे प्रमाणही अधिक असल्याने पाण्याचे टेन्शन वाढणार आहे.
मागणीपेक्षा पुरवठा कमी
मुंबईत रोज ३८०० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. पाण्याची मागणी मात्र दररोज ४२०० दशलक्ष लिटर्स आहे.
दररोज नऊशे दशलक्ष लिटर्स पाणी गळती व चोरीच्या माध्यमातून वाया जाते. पुणे शहराचा हा एका दिवसाचा पाणीपुरवठा आहे.
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रमुख तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख
४७ हजार दशलक्ष लिटर्स जलसाठा असणे अपेक्षित आहे.