तीन विषयात मुंबईकर नापास... शिक्षक दिनानिमित्त पोलिसांचे प्रगती पुस्तक
By मनीषा म्हात्रे | Published: September 5, 2023 09:21 PM2023-09-05T21:21:16+5:302023-09-05T21:21:41+5:30
शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छाबरोबरच विविध भन्नाट पोस्ट व्हायरल होत आहे.
मुंबई : शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छाबरोबरच विविध भन्नाट पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबई पोलिसांचे सुरक्षेबाबतच्या प्रगती पुस्तक लक्ष वेधून घेत आहे. "आयुष्यात आम्हाला चुका करण्यापासून वाचविणारे धडे शिकविण्यासाठी धन्यवाद" असे म्हणत हे प्रगती पुस्तक शेअर करण्यात आले आहे. या प्रगती पुस्तकात तीन विषयात मुंबईकरांना नापास करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डवरील विविध पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केलेलया रिपोर्टमध्ये मुंबईकरांना कुठे पास कुठे नापास याचे ग्रेड देत, अधिक सुधारणा करण्यास वाव असल्याची खुमासदार टिप्पणी केली आहे. या प्रगती पुस्तकात तीन गोष्टींमध्ये मुंबईकर नापास झाले आहेत. ओटीपी शेअर करणे, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि अनोळखी लिंकवर क्लिक करणे याबाबत वांरवार जनजागृती करून देखील मुंबईकर त्याच चुका करत असल्याने त्यात ते नापास झाले आहे.
यात मुंबईकरांना ए प्लस
तर, संशयास्पद हालचालींबाबत माहिती देण्याबरोबरच हेल्मेट घालून प्रवास करण्यात ए प्लस ग्रेड देण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक वायफायवर बँक व्यवहार करण्यास टाळत असल्याने त्यातही ए ग्रेड देण्यात आला आहे.
"शिक्षा अव्हॉइड शिक्षा"
या ट्विटसोबतच योग्य शिक्षण शिक्षेस पात्र होऊ देत नाही. अशा आशयाचेही पोलिसांनी ट्विट करत शिक्षक दिनानिमित्त अनोख्या पद्धतीने जनजागृती केली आहे.