मुंबईकरांची उत्सवी खरेदी ऑनलाइन; सर्वेक्षणातील निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 01:13 AM2020-10-07T01:13:01+5:302020-10-07T01:13:09+5:30
कोरोना प्रादुर्भावाची भीती; उत्साह मात्र कायम
मुंबई : आगामी नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीतील खरेदीसाठी मुंबईकर नेहमीचा विंडो शॉपिंगचा पर्याय बाजूला ठेवून आॅनलाइन शॉपिंगलाच प्राधान्य देणार आहेत. कोरोनाची भीती आणि प्रादुर्भावापासून बचाव हे त्यामागचे प्रमुख कारण असले तरी आॅनलाइन खरेदीही सुरक्षित, सोईची, किफायतशीर, अनेक पर्याय देणारी आणि सहज रिटर्न आणि रिफंड मिळवून देणारी असल्याने त्याला प्राधान्य दिले जाईल, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.
लोकल सर्कल या आॅनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने उत्सव काळातील खरेदीबाबत लोकांचे मत जाणून घेण्यासाठी गेले ३० दिवस सर्वेक्षण केले. यात देशातील ५० शहरांतल्या सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी मते नोंदवली असून त्यात १०,४४२ मुंबईकरांचा समावेश आहे. त्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला.
दरवर्षी नवरात्री, दसरा आणि दिवाळी या सणांदरम्यान सर्वाधिक शॉपिंग केले जाते. यंदा कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटामुळे त्याला कात्री लावली जाईल. मात्र, इलेक्ट्रॉनिक साहित्य, कपडे, घरातील फर्निचर, भेटवस्तू, नवीन वाहन खरेदी करण्याकडे मुंबईकरांचा कल असेल, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली. खरेदीच्या पद्धतीत बदल होईल. बाजारपेठा आणि मॉलमध्ये गर्दी करण्यापेक्षा आॅनलाइन खरेदी केली जाईल, अशी भूमिका बहुसंख्य मुंबईकरांनी मांडली.
स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन
या शॉपिंगचा फटका स्थानिक उत्पादने आणि कलाकारांना बसू नये यासाठी त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय ई कॉमर्स कंपन्यांनी घेतला आहे. तसेच, ही उत्पादने आॅनलाइन उपलब्ध असतील तर त्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले जाईल.
मुंबईकर अशी करणार खरेदी
४२% कॉमर्स साईट आणि अॅप
२३% स्थानिक दुकानदारांकडून घरपोच सेवा
२०% मॉल आणि बाजारपेठा
१५% अद्याप निर्णय नाही
स्मार्ट फोन, लॅपटॉपला प्राधान्य
२४ टक्के मुंबईकर उत्सव काळात स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅबलेट, प्रिंटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देतील.
१० टक्के मुंबईकरांनी घरातील फर्निचर आणि रंगरंगोटी करू, असे मत मांडले.
१० टक्के मुंबईकरांना टीव्ही, फ्रिज, एअर प्युरीफायर, एसी, व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करण्याची इच्छा आहे.
५ टक्के मुंबईकरांनाच उत्सव काळात फॅशनेबल कपड्यांची खरेदी करायची आहे.