मुंबईकरांनी सोशल मीडियावर पाळला अर्थ अवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:06 AM2021-03-28T04:06:59+5:302021-03-28T04:06:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दरवर्षी जगभरात अर्थ अवर पाळला जातो. या उपक्रमाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दरवर्षी जगभरात अर्थ अवर पाळला जातो. या उपक्रमाला शनिवारी मुंबईकरांनी सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद दिला. अर्थ अवर असा हॅशटॅग वापरून शनिवारी सकाळपासून अनेक जणांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले. यासाठी आपल्या घरांतील व आस्थापनांतील वीजवापर रात्री ८.३० ते ९.३० या काळात स्वेच्छेने बंद ठेवावा, असे आवाहन करण्यात येत होते. अनेक जणांनी आपल्या सोशल मीडिया पेज व अकाऊंटवरून रात्रीच्या वेळेस या अर्थ अवरमध्ये सहभाग घेतला. मुंबईतील रहिवासी भागांमध्ये मात्र नागरिकांनी या अर्थ अवरला ठेंगा दाखवला. मुंबईतील विविध परिसरांमध्ये काही मोजक्या लोकांनीच या अर्थ अवरमध्ये सहभाग घेतला.
मुंबईतील अनेक सरकारी इमारतींमध्ये अर्थ अवर पाळला गेला. मुंबईत दररोज रोषणाईने उजळून निघणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीचे दिवेदेखील एक तासासाठी बंद ठेवण्यात आले होते. काही वीज कंपन्यांनीदेखील आपल्या ग्राहकांना या बत्ती बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते, मात्र या आवाहनाला मुंबईकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला.
१९व्या शतकाच्या अखेरपासून पृथ्वीचे सरासरी तापमान १.२० सेल्सिअसने वाढले आहे. काबर्न डायऑक्साइडच्या उत्सर्जनात झालेल्या वाढीमुळे हा बदल झाला आहे. भविष्यात या तापमान वाढीचे गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा जागतिक हवामानशास्त्र संस्थेने दिला आहे. त्यामुळे तापमान वाढ कमी करण्यासाठी हा अर्थ अवर पाळला जातो. जगभरातील १८० राष्ट्र या बत्ती बंदमध्ये सहभागी झाले होते.