Join us

कचऱ्याच्या तक्रारीसाठी मुंबईकरांनो, थोडे थांबा...! जागतिक पर्यावरण दिनाचा मुहूर्त चुकला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 12:23 PM

मुंबईकरांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई :मुंबई महापालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार किंवा सूचना नोंदविता यावी, यासाठी पालिकेकडून लवकरच व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होती. दरम्यान, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवारपासून ही सेवा सुरू होणार होती. मात्र, ही सेवा अद्ययावत करण्याचे काम सुरू असून ते पूर्ण करून लवकरात लवकर हा क्रमांक मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या परिसरातल्या कचऱ्याच्या तक्रारी थेट पालिका अधिकाऱ्यांकडे करण्यासाठी आणि त्या सोडवून घेण्यासाठी मुंबईकरांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात मुंबईत घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना थेट संपर्क सेवा उपलब्ध करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, मुंबई पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त पालिका आयुक्त आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या सूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन खात्याने ही नवीन व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा नागरिकांना उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही प्रणाली मुंबईकरांसाठी अधिक सोपी, सहज व्हावी म्हणून ती अधिक तंत्रस्नेही बनविण्याचा प्रयत्न केला जात असून त्याचे आणखी अपडेशन केले जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, येत्या आठवड्यत ती मुंबईकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे.  

कशी नोंदविता येणार तक्रार?

पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या क्रमांकावर नागरिकांना कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे व मृत जनावरे उचलणे आदींबाबतच्या तक्रारी थेट छायाचित्रांसह करता येणार आहेत. नागरिकांनी तक्रारीसोबत छायाचित्र, त्या ठिकाणाचा पत्ता, जीपीएस लोकेशन पाठविणे आवश्यक आहे. ही तक्रार ८१६९६८१६९७ या व्हॉट्सॲप चॅटबॉटवर नोंदणीकृत झाल्यानंतर, ती संबंधित विभागाकडे थेट जाणार आहे. सध्या तक्रार निर्मुलनाकरीता लागणारा वेळ या सुविधेमुळे कमी होणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित घनकचरा व्यवस्थापन अधिकारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करून त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील आणि त्याद्वारे नागरिकांना तक्रारीचे निर्मूलन केल्याचे समजणार आहे.

 

टॅग्स :मुंबई