इंधन दरवाढीवरून मुंबईकर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 05:20 AM2018-09-17T05:20:56+5:302018-09-17T05:21:20+5:30
सोशल मीडियावर सरकार ट्रोल; मुंबईत पेट्रोलची किंमत शतक पार करणार?
मुंबई : सत्तारूढ सरकार चार वर्षांपूर्वी इंधन दरवाढीवर घोषणाबाजी करत होते. निवडणुकीच्या काळात इंधन दरवाढीचे हत्यार उपसण्यात आले. निवडणूक जिंकल्यानंतर याच सरकारच्या काळात पेट्रोल आणिडिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठून सर्वसामान्याचे कंबरडे मोडले. यावर ‘लोकमत’ने तरुणांच्या प्रतिक्रिया घेतल्या असून, इंधन दरवाढीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सद्यस्थितीत सरकारला ट्रोल करण्यात येत आहे.
‘चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, सुषमा स्वराज यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर आक्रोश करून भाषणे दिली. मात्र,
ही माणसे आता हरवलेली आहेत.’ अशा आशयाचा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. मुंबईत पेट्रोल नाबाद ८९.२९, तर डिझेल नाबाद ७८.२६ झाले आहे. त्यामुळे काही दिवसांत मुंबईत पेट्रोलची किंमत शतक ठोकण्याची शक्यता मुंबईकर व्यक्त करत आहेत. परभणी जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली आहे. त्यामुळे ‘जगात जर्मनी आणि राज्यात परभणी’ असे वाक्य तयार करून हा मेसेज व्हायरल होत आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आलेख वर जात असल्याने सर्वसामान्य लोक मेटाकुटीला आले आहेत. कामगार वर्गाचे खूप हाल होत आहेत. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे.
पेट्रोल दरवाढीने दुचाकी चालविणे मुश्कील झाले आहे. नवीनच दुचाकी खरेदी केली आहे. मात्र, पेट्रोलचे दर वाढल्यामुळे तिला जास्त वेळा चालविण्यासाठी बाहेर काढत नाही. सोशल मीडियाच्या माध्यामातून असे समजत आहे की, पेट्रोलची किंमत ही खऱ्या अर्थाने कमी आहे. मात्र, सरकार त्यावर अधिकचे अनेक कर लावून पेट्रोलची किंमत वाढवत आहे. पेट्रोल दरवाढीमुळे वाहतुकीचे दर, भाज्यांचे दर वाढले आहेत. - दुषांत ढवळे, विक्रोळी
राजकरणी त्याचे काम योग्य रितीने करत असल्याचे दिसून येत नाही. सोशल मीडियावर गोंधळ आणि भारत बंद करून जनतेचे लक्ष वेधण्याचे काम काही राजकीय नेत्यांनी केले. इंधनदर वाढ करणे किंवा कमी करणे, सरकारच्या हातात नाही, असे म्हणणारे सध्याचे सरकार आहे, तर मग सरकार कोणाच्या हातात आहे? असा प्रश्न मला पडतोय.
- रेश्मा आरोटे, कुर्ला
इंधनावर अकारण जाचक कर लावून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढविल्या जात आहेत. आयात कच्चे तेल आणि त्यावर प्रक्रिया करून जो खर्च येणाºया खर्चावर आणि विक्रीमधील दर यामध्ये खूप मोठी तफावत आहे. सर्वसामान्य नागरिक, कर्मचारी वर्ग यांना इंधन दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. - रोहित शिंदे, धारावी
राज्यात परभणीत पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केल्याने, ‘जगात जर्मनी आणि राज्यात परभणी’ अशीच बोलायची वेळ आली आहे. इंधन दरवाढीमुळे गाडी असूनही ती वापरता येत नाही. इंधन दरवाढीचा परिणाम संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर होतो. सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. इंधनाचा दर संपूर्ण देशात सारखा असणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक राज्यात सारख्या दराने इंधन खरेदी करता येईल. - तुषार वारंग, गँ्रट रोड