लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईवर दाटून आलेले मळभ आता हटले असले तरी प्रदूषण मात्र काही प्रमाणात कायम आहे. दुसरीकडे थंडीने मुंबईला काहीशी हुलकावणी दिली असून, किमान तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमान २० अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमानातही वाढ हाेऊन ते ३४ अंशांवर नोंदविण्यात आले. मुंबई सोबत विदर्भातील कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली.
गेल्या आठवड्यात मुंबईत ढगाळ वातावरण कायम होते. सोबत प्रदूषणही होते. त्यातच मुंबई शहर आणि उपनगरात अवकाळी पावसाची नोंद झाली होती. तब्बल तीन दिवस शहर, उपनगरात पावसाने हजेरी लावली होती. कमी दाबाचे क्षेत्र विरल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. मात्र प्रदूषण काही प्रमाणात कायम आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. सोबत कमाल तापमानही २० अंशांवर दाखल झाले आहे. सोमवारी काही प्रमाणात तापमानात वाढ झाल्याने किंचित उकाडा जाणवत होता. मात्र तुलनेने हे प्रमाण कमी होते. आता पुढील काही दिवस कमाल तापमानाचा पारा ३४ अंशावर स्थिर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान, राज्याचा विचार करता इतर शहरांचे कमाल तापमान ३० ते ३२ अंश नोंदविण्यात येत आहे. ते लवकर खाली उतरणार नाही. त्यामुळे सध्या तरी दिलासा मिळणे कठीण आहे, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
............................