मुंबई : गेले सहा महिने कोरोना आणि त्यानंतर भडकलेल्या महागाईची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांची या वर्षी पाणी दरवाढीतून सुटका झाली. आर्थिक संकटात असलेल्या पालिकेने यंदा पाणीपट्टीत दुप्पट ते पाचपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर गुरुवारी मंजुरीसाठी आणला. मात्र सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला.पाणीपट्टीत दरवर्षी सरसकट आठ टक्के वाढ करण्यास २०१२ मध्ये मान्यता देण्यात आली. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात पाणी दरवाढ करण्यात येते. मात्र या वर्षी झोपडपट्टी वगळता सोसायटी, इमारती, हॉटेल व्यावसायिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात शंभर टक्के वाढ सुचवली होती. मात्र आठ टक्के दरवाढ करण्याचे ठरले असताना शंभर टक्के वाढ अन्यायकारक असल्याचे मत सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केले.पाणी दरवाढीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची सूचना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, समाजवादी अशा सर्व पक्षांनी या मागणीचे समर्थन केले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असताना पाणी दरवाढ लादणे अन्यायकारक असल्याचे मत भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केले. पाणी दरवाढीच्या प्रस्तावाबाबत प्रशासनाने सर्वपक्षीय गटनेते, स्थायी समिती अध्यक्षांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, असे मत व्यक्त करीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला.
यंदा पाणी दरवाढीतून मुंबईकरांची सुटका, दुप्पट ते पाचपटीने हाेणार हाेती वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 6:07 AM