लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील हवेची ढासळती गुणवत्ता आणि वाढणारे प्रदूषण म्हणजे कोविडनंतरचे सगळ्यात मोठे असे आरोग्य संकट आहे. त्यामुळे पालिकेने मार्चमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी जाहीर केलेल्या ॲक्शन प्लॅनची तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी आता मुंबईकरांनीच ऑनलाइन सह्यांची मोहीम सुरू केली आहे. अंकित सोमाणी यांनी सुरू केलेल्या मोहिमेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून २ दिवसांत जवळपास ४ हजार लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.
वांद्रे कुर्ला येथील हवेचा स्तर, १० फेब्रुवारी रोजी इतका घसरला होता की, तो ९ सिगारेट्सच्या धुराइतका हानिकारक मानला गेला. मुंबईत उद्भवलेल्या या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पालिकेमार्फत ‘मुंबई स्वच्छ हवा’ उपक्रमाअंतर्गत सात योजनांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अद्यापही पालिकेकडून १०० पद्धतीने या उपक्रमाची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे पालिकेने तात्काळ ७ कलमी स्वच्छ हवा कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी अशी मागणी या ऑनलाइन याचिकेत करण्यात आली आहे.
स्वच्छ हवा कार्यक्रमात काय?
१) स्वच्छ बांधकाम पद्धती२) रस्त्यावरील धूळ कमी करणार३) वाहतुकीसाठी पर्यावरणस्नेही उपाय४) शाश्वत कचरा व्यवस्थापन५) शहरी हरित प्रकल्प६)वायू गुणवत्ता निरीक्षण प्रणाली७)संपर्क आणि जागरूकता मोहीम
मुंबईकरांची शपथ
ऑनलाइन सह्यांची याचिका करणाऱ्या मुंबईकरांनी केवळ पालिकेला त्यांच्या जबाबदारीची आठवण करू दिली नाही तर स्वतः ही मुंबईच्या वाढत्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी हातभार लावण्याची शपथ घेतली आहे. घरातील, कार्यालयातील कचऱ्याची विल्हेवाट लावताना त्याचे स्वतंत्र वर्गीकरण करूनच करावे असे आवाहन सर्व मुंबईकरांना केले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सार्वजनिक तसेच वैयक्तिक पातळीवर करण्याचे ही आवाहन यातून करण्यात आले आहे.