दिवाळी खरेदीसाठी निघालेले मुंबईकर अडकले वाहतूककोंडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 05:48 AM2018-11-04T05:48:19+5:302018-11-04T05:48:28+5:30
दिवाळीपूर्वीच्या शेवटच्या शनिवारचा मुहूर्त साधून घराबाहेर पडलेल्या लाखो मुंबईकरांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. खरेदीसाठी बाजारात निघालेल्या नागरिकांच्या वाहनांची यामध्ये मोठी भर पडल्याने वाहतूककोंडीची परिस्थिती अधिकच बिकट झाली.
मुंबई - दिवाळीपूर्वीच्या शेवटच्या शनिवारचा मुहूर्त साधून घराबाहेर पडलेल्या लाखो मुंबईकरांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. खरेदीसाठी बाजारात निघालेल्या नागरिकांच्या वाहनांची यामध्ये मोठी भर पडल्याने वाहतूककोंडीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुंबईकरांना दिवसाचा सर्वाधिक वेळ वाहतूककोंडीमध्ये घालवावा लागला. त्यातच शहर, उपनगरात अनेक ठिकाणी दिवाळीच्या वस्तूंच्या विक्रीसाठी लावण्यात आलेल्या दुकानांमुळे अंतर्गत रस्त्यावरही मोठी कोंडी झाली.
पश्चिम द्रुतगती महामार्ग, शीव- पनवेल मार्ग, भायखळा ते सीएसएमटीकडे जाणारा मार्ग, दक्षिण मुंबईतील विविध मार्ग, वांद्रे, अंधेरी, चकाला, घाटकोपर, लाल बहादूर शास्त्री मार्ग, अमर महल पूल, वाशी नाका, गोवंडी, शिवाजीनगर, पूर्व द्रुतगती मार्ग, दादर, परळ, कांदिवली, अंधेरी यासह मुंबईतील जवळपास प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमुळे प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र शनिवारी सकाळपासून पाहायला मिळत होते.
जे.जे. उड्डाण पुलावरदेखील वाहतूककोंडी झाली होती. मुंबई पोलिसांनी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात केले. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने आपसूकच वाहतुकीचा वेग मंदावत गेला. त्यामुळे उत्सवाच्या उत्साहात बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा वाहतूककोंडीत अडकल्याने हिरमोड झाला.
दरम्यान, विमानतळ मार्गाजवळ एका वाहनाचा अपघात झाल्याने सायंकाळी पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहनांच्या कोंडीत भर पडली. त्यामुळे वाहने कासवगतीने पुढे सरकत होती. कोंडीत अडकलेल्या मुंबईकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट, फेसबुक पोस्ट, इन्स्टाग्रामवर वाहतूककोंडीची छायाचित्रे अपलोड करून संताप व्यक्त केला.
येथे सर्वाधिक कोंडी
पश्चिम द्रुतगती महामार्ग, शीव-पनवेल मार्ग, भायखळा ते सीएसएमटीकडे जाणारा मार्ग, दक्षिण मुंबईतील विविध मार्ग, वांद्रे, अंधेरी, चकाला, घाटकोपर, लाल बहादूर शास्त्री मार्ग, अमर महल पूल, वाशी नाका, गोवंडी, शिवाजीनगर, पूर्व द्रुतगती मार्ग, दादर, परळ, कांदिवली, अंधेरी.
अनेक मार्गांवर बंदोबस्त वाढवला
आम्ही अनेक पॉइंटवर बंदोबस्त वाढवला आहे. काही ठिकाणी वाहनांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. रस्त्यावरील गर्दी वाढली आहे. वाहतुकीचा वेग मंदावला तरी वाहतूक थांबणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अनधिकृत पार्किंगवर त्वरित कारवाई करून रस्ता मोकळा केला जात आहे. वरिष्ठ अधिकारी स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत.
- दीपाली मसीरकर, पोलीस
उपायुक्त, (वाहतूक), मुंबई शहर