Maharashtra Lockdown : मुंबईकरांनी निर्बंधांनाच केलेय ‘लाॅकडाऊन’; लोकल, बेस्टमधील गर्दी रोखण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 07:19 AM2021-04-17T07:19:52+5:302021-04-17T07:20:21+5:30

Maharashtra Lockdown :अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, गेले दोन दिवस लोकलमधील गर्दी पाहिल्यास बऱ्याच खासगी आस्थापनांनी शासन आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे लक्षात येते.

Mumbaikars have imposed restrictions on 'lockdown'; Failure to stop the crowd at Local, Best | Maharashtra Lockdown : मुंबईकरांनी निर्बंधांनाच केलेय ‘लाॅकडाऊन’; लोकल, बेस्टमधील गर्दी रोखण्यात अपयश

Maharashtra Lockdown : मुंबईकरांनी निर्बंधांनाच केलेय ‘लाॅकडाऊन’; लोकल, बेस्टमधील गर्दी रोखण्यात अपयश

Next

मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु, सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्त्यांवरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली तरी बेस्ट आणि लोकलमधील गर्दीला रोख लावण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून आले.
अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, गेले दोन दिवस लोकलमधील गर्दी पाहिल्यास बऱ्याच खासगी आस्थापनांनी शासन आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे काही महत्त्वाची स्थानके सोडल्यास अन्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या ओळखपत्रांची तपासणी होत नसल्याने अत्यावश्यक सेवेत नसलेले नागरिकही बिनदिक्कत प्रवास करताना दिसतात. दुसरे म्हणजे सोशल डिस्टन्सिंगबाबत रेल्वे प्रवाशांना अद्यापही भान आलेले नाही. एक आसन सोडून बसण्याच्या सूचना फलक चिकटवूनही प्रवासी नियमांचे पालन करीत नाहीत.

बाजारपेठांमध्ये गर्दी उसळतेच
नव्या निर्बंधांनुसार किराणा मालाची दुकाने खुली राहणार असली तरी तेथे गर्दी न करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे, परंतु  लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होण्याच्या भीतीने सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.  दादरच्या बाजारात सकाळी आणि मुंबईतील सर्व स्थानिक बाजारपेठांमध्ये सायंकाळी जत्रा भरल्याप्रमाणे ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची कशी, हा प्रश्न शासनासमोर आहे.

शटर बंद; पण दुकान सुरू... 
मुंबईतील स्थानिक बाजारपेठांमध्ये ‘शटर बंद, पण दुकान सुरू’ अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी बाहेरून हाक दिली की त्यांना आत घेऊन शटर बंद केले जाते. त्यांची खरेदी पूर्ण झाली की पुन्हा शटर उघडून त्यांना जाऊ दिले जाते. गृहवस्तू भंडार, स्टेशनरी, सुवर्णलंकार, हार्डवेअर, इलेक्ट्रिक दुकानदार ही अनोखी शक्कल लढवत आहेत. पोलीस किंवा पालिकेचे पथक गस्तीवर आहे का, यावर नजर ठेवण्यासाठी खास माणसे तैनात केली जातात. त्यामुळे हे दुकानदार कारवाईच्या कचाट्यात सापडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

रेल्वेमधील गर्दी कमी होईना
- उभ्याने प्रवासाची परवानगी नसतानाही पीक अवरमध्ये लोकलचे डबे क्षमतेहून अधिक भरल्याचे चित्र पाहायला मिळते.बेस्टमधील प्रवासी संख्याही फारशी कमी झालेली नाही. गर्दीच्या वेळी तर तुडुंब भरलेल्या बेस्ट बस रस्त्यावरून धावताना दिसतात. 
- चालक आणि वाहकांनी विनंती करूनही अत्यावश्यक सेवेत नसलेले कर्मचारी बसमध्ये चढतात. प्रत्येकाशी भांडण करणे शक्य नसल्यामुळे प्रवाशांचे फावते. 
- पोलिसांची मदत घेतल्याशिवाय बसमधील गर्दी नियंत्रणात येणे अवघड असल्याचे एका बेस्ट वाहकाने सांगितले.

Web Title: Mumbaikars have imposed restrictions on 'lockdown'; Failure to stop the crowd at Local, Best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.