मुंबई : मुघल उद्यान, चिनी उद्यान, जपानी उद्यान, इंग्लिश उद्यान, फ्रेंच उद्यान, अमेरिकन उद्यान व मुक्त उद्यान या प्रकारातील उद्याने नक्की कशी असतात? त्यांची वैशिष्ट्ये व वेगळेपण काय असते, हे प्रत्यक्षपणे बघण्यासह अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे; निमित्त आहे ते उद्यान प्रदर्शनाचे. मुलुंड येथील चिंतामणराव देशमुख उद्यानात ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या वतीने उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून देश-विदेशातील दुर्मीळ वा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींसोबतच विविध उद्यान प्रकार बघण्याची सुसंधी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे, असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.१३ ते १५ जानेवारी दरम्यान वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत ‘कार्टून कॅरेक्टर्स’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याला दीड लाख मुंबईकरांनी भेट दिली होती. त्यानंतर आता पूर्व उपनगरातील मुलुंड परिसरात महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आंतरराष्ट्रीय उद्यान प्रकार या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, सुगंधी झाडे, बोनसाय (बटुवृक्ष) यांचे अक्षरश: शेकडो प्रकार मुंबईकरांना पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, असे परदेशी यांनी सांगितले.
मुंबईकरांना मुघल उद्यान बघण्याची संधी
By admin | Published: February 11, 2017 4:39 AM