मुंबईकरांना पालिकेच्या पाणी प्रकल्पांची प्रतीक्षाच; एकाही प्रकल्पाला सुरुवात नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:06 AM2023-09-04T07:06:28+5:302023-09-04T10:38:47+5:30
मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असून वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची गरजही वाढत आहे.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत रविवारपर्यंत ९० टक्के पाणीसाठा असूनही वातावरणातील बदल व पावसाची ओढ यांमुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट घोंघावत आहे. दरम्यान, मुंबईकरांची भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी गारगायी, पिंजाळ, दमणगंगा धरण प्रकल्पांची घोषणा काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने केली होती. सन २०४० मध्ये पाण्याची गरज पुरवता येईल या दृष्टीने हे प्रकल्प आखण्यात आले होते मात्र त्यापैकी एकाही प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही.
मुंबईला आणखी नवीन धरणे देणारे हे प्रकल्प पालिकेच्या नियोजनात असले तरी अजून काही वर्षे मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी अजूनही पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असून वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची गरजही वाढत आहे.
प्रकल्पांची सद्य:स्थिती काय ?
गारगायी, पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ हे नदीजोड प्रकल्प आहेत. त्याअंतर्गत नवीन धरणे मिळू शकणार आहेत. गारगायी पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प (१,५८६ दशलक्ष लिटर्स प्रतिदिनी) अशी यांची पाणी क्षमता असून ते प्रकल्प पूर्ण झाल्यास पुरवठ्यात २ हजार ८९१ दशलक्ष लिटर्स इतकी वाढ होणे अपेक्षित आहे.
निःक्षारीकरण प्रकल्पही अडला
पालिकेच्या या प्रकल्पांना वेळ लागणार असल्याने दोन वर्षांपूर्वी पालिकेने मनोरी येथे प्रायोगिक तत्वावर निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्याचा हा महागडा प्रकल्प असून अद्याप त्याला सुरुवात नाही. सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर आता हा प्रकल्प मार्गी लागणार की नाही याबाबत साशंकता आहे.