मुंबईकरांनी अनुभवला सलग दोनवेळा 'ब्लॅक 29'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 09:42 PM2017-09-29T21:42:20+5:302017-09-29T21:42:20+5:30
गेल्या महिन्यातील 29 तारखेला पावसामुळे आलेलं पूरसंकटाला मुंबईकर सामोरं गेल्यानंतर आजची सप्टेंबर 29 तारीखही मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी घातकी ठरली.
मुंबई - गेल्या महिन्यातील 29 तारखेला पावसामुळे आलेलं पूरसंकटाला मुंबईकर सामोरं गेल्यानंतर आजची सप्टेंबर 29 तारीखही मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी घातकी ठरली. ज्याची भीती प्रत्येकाला वाटत होती तेच झाले आणि एल्फिन्स्टन-परळ स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 प्रवाशांचा मृत्यू झाला.
ऐन गणेशोत्सवात 29 ऑगस्ट रोजी अचानाक पाऊस कोसळला आणि अवघी मुंबई जलमय झाली. हजारो मुंबईकरांचे पावसामुळे हाल झाले होते. दिवस-रात्र कोसळणार्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडवून दिली होती. मुंबईसह उपनगराच्या अनेक भागात पाणी तुंबले आहे. मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकल सेवाही पूर्णपणे ठप्प झाली. अनेकजणांना कार्यलयातून घरीही जाता आले नव्हते तर काहीजणांना लोकलमध्येच रात्र काढावी लागली होती. या पूरदुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचाही मॅनहोलमध्ये पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनेच्या आठवणी ताज्या असताना आज एका महिन्यानंतर पुन्हा 29 तारखेलाच आणखी 22 मुंबईकरांना नाहक जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेचं एक कारण पाऊसही आहे.
आज सकाळी मुंबई शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावरील पत्र्याचा काही भाग खाली कोसळल्याचे वृत्त समोर आले. मात्र पूल सुरक्षित होता. पण या घटनेदरम्यान प्रवाशांमध्ये पूल पडल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमका याचसुमारास जोरदार पाऊस पडला आणि अनेक प्रवासी बाहेर न जाता खोळंबले होते. त्यात नवीन येणारी प्रत्येक गाडी हजारो प्रवासी या दोन्ही स्टेशनांवर येत होते. त्यामुळे थोड्याच वेळात या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. त्यात झालेल्या लहान घटनेमध्ये पूल पडल्याच्या अफवेची भर पडली. काही जणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची बोंब ठोकली. या सगळ्याचा विपरीत परिणाम होत प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता वाढली. ब्रिजबाहेर निघण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने ब्रिजच्या बाजूला लावलेले पत्रे फोडून लोकांना बाहेर काढावं लागलं.
मात्र तोपर्यंत उशिर झाला होता कारण या चेंगराचेंगरीने 22 पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला होता. या चेंगराचेंगरीत अनेक महिलांचे कपडे फाटले, अनेकांच्या हाता-पायाला मुका मार लागला होता. महिलांचा आरडाआोरडीने ब्रिजशेजारी असलेल्या रेल्वे वसाहतीत राहणारे बाहेर आले. त्यांना जे दृश्य समोर दिसलं ते अत्यंत भयानक होतं. या रहिवाशांनी देखील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर या रहिवाशांनी त्यांना चहा,पाणी आणि प्राथमिक औषधोपचार केला. मुंबईकरांसाठी 29 तारीख पुन्हा एकदा संकटाची ठरली.