मुंबईकरांना उन्हाचा तडाखा; धुळीचीही भर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:38 AM2019-03-07T00:38:59+5:302019-03-07T00:39:04+5:30
मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी दिवसा पडणाऱ्या कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत.
मुंबई : मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी दिवसा पडणाऱ्या कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. विशेषत: गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून, राज्यातील अनेक शहरांचे कमाल तापमान ३५ अंशावर पोहोचले आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात उडणारी धूळ यात आणखी भर घालत असून, सध्या मुंबईकरांना उन्हासह धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील बुधवारी सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान अहमदनगर येथे ३७ तर सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ७ ते ९ मार्चदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १० मार्च रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे.
कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरी नोंदविण्यात आले़
>राज्याचा पारा वाढला
राज्यातील शहरांचा कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असून, अहमदनगर, कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या शहरांचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले़