मुंबई-बहुप्रतिक्षित 18 व्या लोकसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा काल दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.मुंबईत येत्या दि,20 मे रोजी सहा लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे.
यंदा मुंबईतून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी विविध उपक्रम राबवण्यास याआधीच सुरवात केली आहे. निवडणूक स्वीप कार्यक्रमचे समन्वय अधिकारी हे स्वतः प्रसिद्ध अभिनेत्यांची त्यांचे घरी जाऊन भेट घेत असून विशेष म्हणजे अभिनेते मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
मुंबई शहर व उपनगराचे निवडणूक स्वीप कार्यक्रम समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी आणि जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या जेव्हीपीडी स्कीम,गुलमोहर क्रॉस रोड नंबर 5 येथील कृष्णा बंगल्यात जावून त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत आपण व आपल्या कुटुंबाने मतदान करावे असे उपनगर जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले पत्र त्यांना आणि त्यांचे पुत्र तुषार कपूर यांना दिले. त्यांची भेट मिळण्यासाठी पश्चिम विभागाचे अपर पोलिस आयुक्त परमजित सिंह दहिया आणि परिमंडळ नऊचे पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले अशी माहिती दळवी यांनी दिली.
आम्ही सुमारे पाऊण तास त्यांच्या बंगल्यात होतो,त्यांनी चांगले स्वागत केले.आणि आपल्या आवाजात त्यांनी मुंबईतील आणि देशातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले अशी माहिती डॉ. सुभाष दळवी यांनी लोकमतला दिली. यावेळी आपल्या खणखणीत आवाजात मतदारांना आवाहन करतांना जितेंद्र कपूर म्हणाले की,मी मुंबईतील आणि देशातील मतदारांना आवाहन करतो की, संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे, त्याचा उपयोग करून मतदारांनी मतदान करून आपले अमूल्य मत द्यावे. तसेच मतदार यादीत आपले नाव आहे का याची मतदारांनी वोटर ॲप वर खात्री करून घ्यावी, जर आपले नाव मतदार यादीत नसेल तर लगेच त्याची नोंदणी करावी. येणाऱ्या निवडणुकीत मतदान करून आपले अमूल्य मत देवून देशासाठी आपली जबाबदारी पार पाडा. मी प्रत्येक निवडणुकीत मतदान करतो,आपणही मतदान करा.