Join us  

टीम इंडियातील मुंबईकर शिलेदारांवरून काँग्रेसचं ‘उत्तर भारतीय कार्ड’, मराठी आणि परप्रांतीय भेद करणाऱ्यांना लगावला टोला  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 1:23 PM

Team India In Mumbai: गुरुवारी संध्याकाळी विश्वविजेत्या भारतीय संघाची मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये लाखो क्रिकेटप्रेमी मुंबईकर उपस्थित होते. मात्र भारतीय संघाच्या विश्वविजयावरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे.

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीत थरारक विजय मिळवल्यानंतर मायदेशी परतलेल्या भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गुरुवारी संध्याकाळी विश्वविजेत्या भारतीय संघाची मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये लाखो क्रिकेटप्रेमी मुंबईकर उपस्थित होते. मात्र भारतीय संघाच्या विश्वविजयावरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. काल भारतीय संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातवरून आणलेल्या बसवरून वाद झाला होता. त्यानंतर आज काँग्रेसने भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा दाखला देत मराठी आणि परप्रांतीय असं राजकारण करणाऱ्या मनसेला आणि मनसेला सोबत घेणाऱ्या भाजपाला डिवचलं आहे. 

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात सचिन सावंत यांनी लिहितात की , आमचे लाडके मुंबईकर असलेल्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी देशाचं नाव उंचावलं आहे, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांना आज विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात सन्मानित करण्यात येईल. तर सर्व मुंबईकरांनी काल त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे.

त्यानंतर मुंबईकरांमध्ये मराठी आणि परप्रांतीयांमध्ये भेद करणाऱ्या मनसेसारख्या पक्षांना आणि नेत्यांना  टोला लगावताना सचिन सावंत यांनी लिहिलं की, मुंबईच्या या सुपुत्रांमधील सूर्यकुमार यादवचा जन्म हा उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे आणि यशस्वी जयस्वालचा जन्म उत्तर प्रदेशमधील भदोई येथे झालेला आहे. शिवम दुबेचा जन्म हा मुंबईत झाला आहे. मात्र त्याचे वडील उत्तर प्रदेशमधील भदोई येथील रहिवासी आहेत. तर रोहित शर्माची मातृभाषा तेलुगू आहे. मात्र तो चांगली मराठी बोलतो.

मुंबई एक स्वप्नांचं शहर आहे. यशस्वीचं यश त्या फेरीवाल्यांमधील एकासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे ज्यांचा काही राजकीय पक्ष द्वेष करतात. मुंबईचा विकास आणि जगामध्ये मुंबईचं नाव उंचावण्यासाठी इतर प्रांतामधील लोकांनीही मराठी माणसांसह खांद्याला खांदा लावून योगदान दिलेलं आहे. ते मुंबईकर असल्याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे. आम्हालाही त्यांचा अभिमान आहे, असे सचिन सावंत यांनी या पोस्टमध्ये लिहिले.

त्यानंतर सावंत यांनी मुंबईत परप्रांतीयांवरून राजकारण करणाऱ्यांना टोला लगावला. ते म्हणाले की, जे लोक मुंबईकरांमध्ये मराठी आणि परप्रांतीय असं ध्रुवीकरण आणि द्वेषाचं राजकारण कतात. त्यांनी शुद्धीवर यायला हवं. तसेच सत्तेसाठी अशा पक्षांना साथ देणाऱ्या भाजपालाही या सुखद क्षणी सद्बुद्धी मिळावी, असे सचिन सावंत म्हणाले. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयसीसी विश्वचषक टी-२०मुंबईकाँग्रेसमनसेभाजपासचिन सावंत