Join us

मुुंबईकरांचे कोरोनाला सहपरिवार निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नाही. फलाट तर खचून भरले आहेत. तिकीट घ्यायला खिडक्यांवर ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नाही. फलाट तर खचून भरले आहेत. तिकीट घ्यायला खिडक्यांवर ही गर्दी. बेस्टचीदेखील अशीच अवस्था; जणू काही माणसे कोंबून भरली आहेत. बरं, यांना जायचे कुठं? तर हाजीअली, जुहू बीच, मरिन ड्राइव्ह, गेट वे, सीएसएमटी नव्हे; तर व्हीटी, वांद्रे नव्हे, बँड्रा, दादर. आणि कशासाठी ? तर मजा करण्यासाठी...

अरे कोरोना, बिरोना काही आहे का नाही. तिकडे सरकार घसा फोडून बोंबलत आहे की, घरात बसा. सामाजिक अंतर पाळा. काम असेल तरच घराबाहेर पडा. पण तरीही ऐन शनिवारी, रविवारी पर्यटनस्थळी दाखल झालेल्या या नागरिकांमुळे कोरोनाच्या सुपर स्प्रेडचा धोका पुन्हा एकदा वाढला असून, आता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या, कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या, सामाजिक अंतर धुळीस मिळविणाऱ्या आणि मास्क खुंटीला टांगून ठेवणाऱ्या अशा नागरिकांना चांगलाच धडा शिकविण्याची गरज आहे, असा सूर उमटत आहे.

कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने सर्व स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. याचा एक भाग म्हणून मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर उपाय योजले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी वावरताना सामाजिक अंतर पाळणे, मास्क परिधान करणे आणि हात धुणे असे अनेक उपाय करण्यास सांगितले जात आहेत. बहुतांश ठिकाणी याचा फज्जा उडाला आहे. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे लोकल किंवा गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नाही.

बेस्टमध्येदेखील हीच अवस्था आहे. याव्यतिरिक्त घाटकोपर, कुर्ला, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली अशा मोठ्या रेल्वे स्थानक आणि बाजार परिसरातदेखील सामाजिक अंतर धुळीस मिळाले असून, मास्क परिधान करत नसलेल्यांची संख्यादेखील वाढत आहे. परिणामी अशा नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत असून, समुद्र किनारी अथवा उद्याने किंवा तत्सम परिसरातदेखील घोळक्याने, गर्दीने वावरणाऱ्यांच्या संख्येत भर पडत आहे. येथे कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हणणे जागरूक नागरिकांकडून मांडले जात आहे.