मुंबईकरांचा प्रवास गेला खड्ड्यात
By Admin | Published: July 17, 2014 01:06 AM2014-07-17T01:06:22+5:302014-07-17T01:06:22+5:30
वाहनांची वाढलेली संख्या आणि अनेक ठिकाणी होत असलेले पार्किंग यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात वाहन चालवणेही कठीण होऊन बसले आहे
मुंबई : वाहनांची वाढलेली संख्या आणि अनेक ठिकाणी होत असलेले पार्किंग यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात वाहन चालवणेही कठीण होऊन बसले आहे. या कारणांमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असतानाच पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे तर मुंबईकरांचा प्रवास आणखीनच खडतर होत चालला आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनांची सुटका करताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत असून खड्ड्यांची समस्या सुटणार कधी, असा प्रश्न वाहतूक पोलिसांकडूनच उपस्थित केला जात आहे. जवळपास ५०० खड्ड्यांमुळे शहर आणि उपनगरात वाहतूककोंडी होत आहे.
मुंबईत प्रत्येक दिवशी ४०० ते ४५० वाहनांची भर पडत असून सध्या २२ लाख वाहने रस्त्यावर धावत आहेत. गेल्या काही वर्षांत वाहनांची वाढत जाणारी संख्या पाहता मुंबईकरांना पार्किंगबरोबरच वाहतूककोंडीसारख्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. अगोदरच वाढलेल्या वाहनांमुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत असतानाच त्यामध्ये भर पडली आहे ती खड्ड्यांची.
मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होत असून वाहतूक पोलिसांना मात्र त्याचा नाहक फटका बसत आहे. सध्या दोन हजार खड्डे मुंबईतील रस्त्यांवर असून यातील वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर जवळपास ५०० खड्डे आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे खड्डे असलेल्या रस्त्यांवरून जाताना वाहनचालकांचा प्रवास तब्बल एक तासाने वाढल्याचा दावा वाहतूक पोलीस करतात.
याबाबत सहपोलीस आयुक्त (वाहतूक) बी.के. उपाध्याय यांनी सांगितले की, वाहनांची खूप वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर जवळपास ५०० खड्डे असून त्याचाच सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. प्रत्येक वर्षी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि वाहतूक पोलिसांना वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागतो. पेडर रोड, मोझेस रोड, एस. व्ही. रोड, माहीम कॉजवे, एल.बी.एस. रोड, आंबेडकर रोड, पी. डिमेलो रोडवरून जाताना वाहनचालक बरेच त्रस्त होतात. त्यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला मार्ग वळवण्याशिवाय पर्याय राहत नाही. पावसाळ्यात रस्त्यांना पडणाऱ्या या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेगही मंदावतो आणि परिणामी वाहतूककोंडीत भर पडत जाते. (प्रतिनिधी)