मुंबई : मुंबईचे कमाल तापमान शनिवारी ३५.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, आर्द्रता ६३ टक्के नोंदविण्यात आली आहे. आर्द्रतेमधील चढउतार मुंबईकर घामाघूम होण्यास कारणीभूत असून, शनिवारी ढगाळ वातावरणाने यात आणखी भर घातल्याचे चित्र होते. रविवारसह सोमवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ आणि २८ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट होती. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे; उर्वरित भागांत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले आहे.
ढगांचा कडकडाट; सोसाट्याचा वारा!२ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील; शिवाय विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट राहील. ३ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि उष्णतेची लाट राहील. ४ आणि ५ जून रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील. दरम्यान, २ आणि ३ जून रोजी कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.