Join us

मुंबईकरांचे आयुष्य ३.५ वर्षांनी कमी झाले; जल आणि वायुप्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:06 AM

जल, वायुप्रदूषणाचा विळखालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक परिसर सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत असून, ...

जल, वायुप्रदूषणाचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक परिसर सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत असून, बीकेसी, चेंबूर, कुर्ला यासारख्या परिसरांनी प्रदूषणाची कमाल पातळी गाठली आहे. परिणामी, जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार वायुप्रदूषण एका विशिष्ट मर्यादेत रोखता आले तर महाराष्ट्रातील शहरांमध्ये राहण्याऱ्या लोकांच्या आयुष्यात वाढ होऊ शकते; आणि ही वाढ मुंबई ३.५ वर्षे, ठाणे ३.४ वर्षे, पुणे ३.७ वर्षे, नागपूर ३.९ वर्षे आणि नाशिक २.८ वर्षे अशी असू शकते. मात्र जल आणि वायुप्रदूषणामुळे येथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील वरील प्रमाणे वर्षे कमी होत आहेत.

महाराष्ट्राचे आर्थिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या मुंबईत उद्योगधंद्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, वाढत्या प्रदूषणामुळे श्वसन आणि हृदयवाहिनी कमजाेर हाेत असून, अस्थमा, श्वासनलिका दाह, उच्च रक्तदाब, फुप्फुसाचा कर्करोग इत्यादींचे त्रास वाढत आहेत. हृदयवाहिनी आणि श्वसनाच्या विकारांमुळे मृत्यू होत आहेत.

मुंबई किनारपट्टीचा प्रदेश आहे. येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र जलद औद्योगिक, पायाभूत विकासासह हवेची गुणवत्ता खालावत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कारखान्यांत दरवर्षी दोन दशलक्ष टन कोळसा जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण होत असल्याचे दिल्ली येथील विज्ञान आणि पर्यावरण मंत्रालयाच्या सीएसई या संस्थेने अभ्यासात म्हटले आहे. एमएमआरमध्ये ४ हजार ३५५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश असून, या क्षेत्रात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार आणि मीरा-भाईंदर या आठ महानगरपालिका आहेत. मुंबईनजीक असलेल्या १३ औद्योगिक क्षेत्रांपैकी ट्रान्स-ठाणे खाडी, तळोजा, अंबरनाथ आणि डोंबिवली या ठिकाणांचे मूल्यमापन केले असता या क्षेत्रात जवळपास ७० टक्के कार्यरत उद्योगांचा समावेश आहे. हे उद्याेग प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.

* महापालिकेकडून हाेते दुर्लक्ष

मुंबईमध्ये वातावरण स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. मुंबई महापालिका ही जबाबदारी नीट पार पाडते की नाही, हे पाहण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहे. मंडळाच्या नुकत्याच एका अहवालानुसार, सांडपाण्याबाबत महापालिका काहीच कार्यवाही करीत नाही. वारंवार नोटीस देऊनही काम केले जात नाही. उपाय हाती घेतले जात नाहीत. केंद्रीय मंडळानेही महापालिकेला दोन कोटींचा दंड आकारला आहे. मात्र महापालिकेचा कारभार मनमानी आहेत. बहुतांश नगरसेवक यात सामील आहेत. मुंबई महापालिका केवळ उत्पन्नाचे साधन राहिली आहे.

- डी. स्टॅलिन, पर्यावरणतज्ज्ञ

* हवेच्या गुणवत्तेचा दर्जा ढासळला

अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, उल्हासनगर, बदलापूर आणि ठाणे या शहरांना हवेच्या गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यात यश आलेले नाही. हवेची गुणवत्ता ६० इतकी म्हणजेच हवेतील पीएम २.५ चे प्रमाण ६० मायक्रो ग्रॅम पर मीटर क्यूबपेक्षा कमी असावे लागेल किंवा लागते. मात्र ते त्यापेक्षा जास्त आहे.

* प्रदूषणकारी घटक

पश्चिम द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वांत जास्त गाड्यांच्या वर्दळीचा मार्ग असून, १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ३ ते ४ तासांचा अवधी लागत आहे. परिणामी, वायुप्रदूषण वाढत असून, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित मार्ग म्हणून मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गाकडे पाहिले जात आहे. अंधेरी ते दहिसर भागात राहणाऱ्या नागरिकांना या वाढलेल्या वाहतूककोंडीचा त्रास हाेत आहे. श्वसनविकार व त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडत आहे.

* उद्योगांची नोंदणी नाहीच

कुर्ला, अंधेरी, साकीनाका, धारावी, गोवंडी, मानखुर्द, मालाड-मालवणी अशा बहुसंख्य वस्त्यांमध्ये छोटेमोठे उद्योग आहेत. यातील बहुतांश उद्योगांची नोंदणी नाही. यातून सोडले जाणारे सांडपाणी थेट मिठीसारख्या नदीत, नाल्यांत, गटारांत आणि पुढे समुद्रात मिसळते. याचा फटका जलचरांना बसण्यासह सागरी किनारे प्रदूषित होतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रदूषणाची पातळी

- रस्त्यावरील धुळीचे प्रमाण एकूण प्रदूषणात सर्वाधिक (७१ ते ४५ टक्के) आहे.

- त्याखालोखाल ८ टक्के वाटा बांधकामांचा आहे.

- ३ टक्के वाहनांच्या प्रदूषणाचा असून उर्वरित उद्योग, घरगुती जळण, विमान वाहतूक, जहाजे, खाणावळी, बेकरी आणि स्मशानभूमीचा आहे.

- ३५ टक्के वाटा हा नायट्रोजन ऑक्साइडसाठी उद्योग क्षेत्रांचा आहे.

- १८ टक्के वाटा हा घरातून हाेणाऱ्या प्रदूषणाचा आहे.

प्रदूषणाचे स्रोत : उद्योग, कोळसा ज्वलन, विविध वायू ज्वलन, वाहतूक, कचरा ज्वलन, बांधकामे आणि रस्त्यावरील धूळ, घरगुती प्रदूषण

-----------------