मुंबईकरांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 05:22 PM2020-06-21T17:22:06+5:302020-06-21T17:22:45+5:30
सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक मुंबईकरांनी गच्चीसह बाल्कनी आणि राहत्या वस्तीलगतची मोकळी जागा निवडत तब्बल दिड एक तास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.
मुंबई : अनलॉक सुरु झाले असले तरी अद्याप मुंबईत अनेक घटकांवर निर्बंध आहेत. परिणामी काही प्रमाणात असलेले ढगाळ आकाश आणि कोरोना काळातील अडचणी लक्षात घेता रविवारचे सूर्यग्रहण मुंबईकरांना पाहता येईल की नाही? याबाबत थोडी सांशकता होती. मात्र हवामानाने साथ दिली आणि ढगाळ हवामान हटले. शिवाय सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक मुंबईकरांनी गच्चीसह बाल्कनी आणि राहत्या वस्तीलगतची मोकळी जागा निवडत तब्बल दिड एक तास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. ज्यांना बाहेर पडणे शक्य नव्हते अशांनी अनेक विज्ञानाशी निगडीत संकेतस्थळावर सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण पाहिले. तर अनेकांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी होत असलेले सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण पाहिले.
रविवारी सकाळी दहा साडे दहा वाजल्यापासून सुरु झालेले सूर्यग्रहण दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत पाहत येत होते. उत्तर भारतात कंकणाकृती तर उर्वरित भारतात खंडग्रास सूर्यग्रहण पाहता आले. हवामान खात्याने वर्तविल्याप्रमाणे सकाळी काळ मुंबईवर ढग दाटून आले होते. तर ग्रहण सुरु झाल्यापासून पावसाच्या दोन ते तीन मोठया सरीदेखील आल्या होत्या. मात्र पावसाचे हे वातावरण मात्र फार काही काळ टिकले नाही. विशेषत: सकाळी साडे अकरा ते दुपारी बारावाजेपर्यंत मुंबईत आकाश मोकळे झाले; आणि बहुतांश मुंबईकरांनी गच्चीवरून, राहत्या वस्तीलगतच्या मोकळ्या जागेतून खबरदारीचे उपाय बाळगत ग्रहण पाहण्याचा मनमुरात आनंद लुटला. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्राच्या माध्यमातूनदेखील ग्रहण पाहता यावे यासाठी विशेषत: व्यवस्था करण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरातून बहुतांश नागरिक ग्रहणाचा आनंद लुटण्यासाठी नेहरु विज्ञान केंद्र येथे दाखल झाले होते, अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली. तर दुसरीकडे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीतर्फेदेखील मुंबई शहर आणि उपनगरात ग्रहणाबाबतचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रभादेवी, लालबाग, शिवडी, जोगेश्वरी, दहिसर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. विशेषत: जोगेश्वरी येथे ज्येष्ठ नागरिक प्रभाताई पुरोहित यांनी समितीच्या माध्यमातून ग्रहण पाहिले. ग्रहणात काही खाऊ नये. पिऊ नये. ही अंधश्रध्दा दूर करण्यासाठी प्रभादेवी येथील प्रभादेवी हाऊसिंग सोसायटीमध्ये देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती समितीकडून देण्यात आली. शिवाय जेथे ढगाळ वातावरण होते; तेथील नागरिकांना ग्रहण पाहता यावे यासाठी फेसबुक लाइव्हद्वारे ग्रहण दाखविण्यात आले. एकंदर अनेक अडथळे दूर करत मुंबईकरांनी रविवारी झालेले सूर्यग्रहण विविध माध्यमातून पाहिल्याचे चित्र होते.