Join us  

मुंबईकरांची ‘मेट्रो’ला पसंती

By admin | Published: April 15, 2016 1:55 AM

लोकल गाड्यांना अहोरात्र असलेली प्रचंड गर्दी आणि त्यामुळे लोकल डब्यात प्रवेश करण्यासाठी उडत असलेली तारांबळ हे मध्य रेल्वे मार्गावर नेहमीचेच दृश्य. परंतु लोकल गाड्यांना असणारी

मुंबई : लोकल गाड्यांना अहोरात्र असलेली प्रचंड गर्दी आणि त्यामुळे लोकल डब्यात प्रवेश करण्यासाठी उडत असलेली तारांबळ हे मध्य रेल्वे मार्गावर नेहमीचेच दृश्य. परंतु लोकल गाड्यांना असणारी ही गर्दी काही प्रमाणात का होईना, कमी झाल्याचे चित्र आहे. मेट्रो रेल्वे आणि ईस्टर्न फ्री-वे या नव्या पर्यायांमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्ये घट झाली आहे. वर्षभरात मध्य रेल्वे लोकलवरील प्रवासी ८२ लाख ७० हजारांनी कमी झाल्याची माहिती खुद्द रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मध्य रेल्वे लोकलमधून दिवसाला ४० ते ४२ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेचा आवाका हा सीएसटीपासून कर्जत, कसारा, खोपोली, पनवेल आणि अंधेरीपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून १,६०० लोकल फेऱ्या चालविल्या जातात. प्रवाशांचा गर्दीतला प्रवास सुकर व्हावा, यासाठी नवीन लोकलबरोबरच जादा फेऱ्या चालविण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून केले जात आहे. त्याचबरोबर मेल-एक्स्प्रेसमधूनही प्रवास करण्याची मुभा दिली गेली आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तर बारा डबा लोकलचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढणार असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासन करत आहेत. एकूण गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जरी प्रयत्न केले जात असले तरी हा प्रवास मेट्रो आणि फ्री वेमुळे बराचसा सुकर होत असल्याचेही वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.लोकल प्रवाशांकडून घाटकोपर-अंधेरी मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानक गाठण्यासाठी मध्य रेल्वे प्रवासी घाटकोपरमार्गे मेट्रोचा वापर करत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे घाटकोपर किंवा त्यापुढे जाण्यासाठी दक्षिण मुंबईतील पी. डीमेलो रोडमार्गे अवघ्या २० ते २५ मिनिटांत जाण्याचा पर्यायही मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांनी निवडला आहे. त्यामुळेच वर्षभरात ८२ लाख ७० हजार प्रवासी कमी झाले आहेत. तसेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथेही मोठ्या प्रमाणात सरकारी व खासगी कार्यालये स्थलांतरित झाल्याने लोकल प्रवासी कमी झाल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)लांब पल्ल्याच्या सेवांना फटकामध्य रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांना गेल्या वर्षभरात चांगलाच फटका बसला आहे. गेल्या वर्षात इटारसी येथील सिग्नल यंत्रणेला लागलेल्या आगीमुळे १ हजार ९०६ ट्रेन रद्द कराव्या लागल्या होत्या. त्याचबरोबर हँकॉक पूल पाडण्याचे काम करावे लागणार असल्याने ४८ मेल-एक्स्प्रेसही रद्द कराव्या लागल्या होत्या. या दोन महत्त्वाच्या घटनांबरोबरच हरदा येथे रुळावरून एका ट्रेनचे डबे घसरल्याने रुळांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम अनेक गाड्यांवर झाला होता. यासह अन्य कारणांमुळे मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या प्रवासी संख्येत ४२ लाख ४० हजारांची घसरण झाली आहे.