मान्सून सरींच्या हलक्या बरसातीने सुखावले मुंबईकर

By admin | Published: June 23, 2017 01:23 AM2017-06-23T01:23:32+5:302017-06-23T01:23:32+5:30

मुंबईकरांवर रुसलेला मान्सून गुरुवारी अखेर काही प्रमाणात का होईना बरसला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडक्यात दिलासा मिळाला.

Mumbaikar's mild rainy season has dried up | मान्सून सरींच्या हलक्या बरसातीने सुखावले मुंबईकर

मान्सून सरींच्या हलक्या बरसातीने सुखावले मुंबईकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांवर रुसलेला मान्सून गुरुवारी अखेर काही प्रमाणात का होईना बरसला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडक्यात दिलासा मिळाला. सकाळी पडलेल्या कडक उन्हानंतर दुपारी मुंबापुरीवर पावसाचे ढग दाटून आले आणि पाहता पाहता शहराला कवेत घेतलेल्या ढगांनी मनमुराद बरसात केली. दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई आणि पूर्व-पश्चिम उपनगरात दुपारी अक्षरश: बरसलेल्या पावसाने मुंबईकरांना काही काळ धडकीच भरवली होती.
मागील आठवड्यातील सोमवारी मान्सून मुंबईत दाखल झाला. मुंबईत दाखल झाल्यानंतर मात्र मान्सूनने मोठा ब्रेक घेतला. मान्सूनच्या विश्रांतीमुळे वातावरणात झालेले बदल आणि कमाल तापमानात झालेल्या वाढीने मुंबईकरांचा घाम काढला.
परिणामी उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर आतुरतेने पावसाची वाट पाहू लागले. पण काही केल्या मान्सून क्रियाशील होईना. अखेर हवामानात झालेल्या बदलामुळे मान्सून बुधवारी अ‍ॅक्टिव्ह झाला आणि गुरुवारी
पडलेल्या पावसाने मुंबईला चिंब भिजवले.
मुंबईवर सकाळी कडाक्याचे ऊन पडले होते. परिणामी मुंबई घामाघूम होतच होती. अखेर दुपारी मात्र दाटून आलेल्या ढगांनी शहरावर काळोख केला आणि दुपारनंतर सर्वत्र पावसाच्या सरी बरसू लागल्या. दुपारी दादर, लोअर परळ, करी रोड, लालबागसह आसपासच्या परिसरात सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी लागली. कालांतराने ढगांच्या गर्दीत भरच पडू लागली आणि पाहता पाहता पावसाने नाहूर, कांजूर, घाटकोपर, कुर्ला, सायन, वांद्रे-कुर्ला संकुलासह दक्षिण मुंबईतल्या परिसरांना कवेत घेतले आणि जोरदार बरसलेल्या मान्सून सरींनी मुंबईकरांचा पावसाचा आनंद द्विगुणित केला.

शहरात ४, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात १ अशा ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.
शहरात ३, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १२ ठिकाणी झाडे पडल्याचा घटना घडल्या.
शहरात १, पूर्व उपनगरात २ अशा एकूण ३ ठिकाणी घर किंवा भिंतीचा काही भाग पडल्याच्या घटना घडल्या.
पूर्व उपनगरात २२ जून रोजी मध्यरात्री १२.५५ वाजता चुनाभट्टी पूर्वेकडील टाटानगर येथील तळमजला अधिक एक मजला असे बांधकाम असलेल्या एका घराचा भाग पडल्याची घटना घडली.
या दुर्घटनेत कुमुदिनी गावित या जखमी झाल्या. सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Web Title: Mumbaikar's mild rainy season has dried up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.