मुंबईकरांनो : पाण्याचे नो टेन्शन; तलाव भरत आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 04:40 PM2020-08-16T16:40:16+5:302020-08-16T16:40:42+5:30
तलावांतील पाण्याचा साठा आता वाढत आहे.
मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करत असलेल्या सातही तलावांतील पाण्याचा साठा आता वाढत आहे. ५ ऑगस्ट रोजी जेव्हा मुंबई महापालिकेने पाणी कपात लागू केली तेव्हा हा पाण्याचा साठा ३७ टक्के होता. याच काळात तलाव क्षेत्रात पावसाने जोर पकडल्याने सातही तलावांतील पाण्याचा एकूण साठा ७६ टक्के झाला आहे. आणि हे पाणी मुंबईकरांना पुढील नऊ महिने पुरेल, असा दावा महापालिकेला आहे.
गेल्या १२ दिवसांत तलावातील पाण्याच्या साठयात दुप्पट वाढ झाली आहे. ४ ऑगस्ट रोजी सात तलावांत मिळून ५ लाख ५ हजार ८९६ दशलक्ष लीटर होता. १६ ऑगस्ट रोजी हा पाणी साठा १० लाख ९९ हजार ४४५ दशलक्ष लीटर एवढा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह लगतच्या जिल्हयांत पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी आणि विहार या सात तलावांतून मुंबईकरांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र तलाव क्षेत्रात पाऊस कमी झाल्यासह तलावातील पाण्याचा साठा कमी झाल्याने मुंबई महापालिकेने ५ ऑगस्ट रोजी मुंबईत २० टक्के पाणी कपात लागू केली होती.
मुंबईत देखील पावसाची रिमझिम सुरुच असून, ५ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला आहे. १२ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. १२ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घडल्या आहेत. तर पावसाची नोंद जेमतेम २० मिलीमीटर एवढी झाली असून, सोमवारी देखील पावसाचा जोर मध्यम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
......................
तलाव पाणीसाठा (दशलक्ष लिटर्स)
अप्पर वैतरणा १३५०७७
मोडक सागर ११६८३१
तानसा ११४९१३
मध्य वैतरणा १५९९१४
भातसा ५३६९६६
विहार २७६९८
तुळशी ८०४६
एकूण १०९९४४५(७५.९६ टक्के)