Join us

मुंबईकरांनो, आता लसीकरणासाठी थेट या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी सुधारित सूचना दिल्या गेल्या असून, २४ ते २६ मे असे ३ दिवस लसीकरणासाठी ...

मुंबई : मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी सुधारित सूचना दिल्या गेल्या असून, २४ ते २६ मे असे ३ दिवस लसीकरणासाठी थेट येण्याची (वॉक इन) मुभा असणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

२४ ते २६ मे असे ३ दिवस कोविशिल्डसाठी ६० वर्षे व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे लाभार्थी, ६० वर्षे ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी, आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाइन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी आणि ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी हे सर्वजण लस घेऊ शकतील. त्यासोबत, कोव्हॅसिन लसीचा विचार करता, सर्व वयोगटातील, दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येऊ शकतील. २७ ते २९ मे असे तीन दिवस प्रत्येक केंद्रावर १०० टक्के लसीकरण हे कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर, लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकिंग) करण्यात येईल. ३० मे रोजी लसीकरण बंद राहील.

लसीच्या मात्रांमध्ये आता १२ ते १६ आठवड्यांचे अंतर

कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रांमध्ये पूर्वीच्या ६ ते ८ आठवड्यांऐवजी आता किमान १२ ते १६ आठवड्यांचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोविशिल्ड लसीच्या पहिल्या मात्रेनंतर ८४ दिवसांचे अंतर राखून दुसरी मात्रा दिली जाईल.

८४ दिवसांनंतर दुसरी लस

१ मार्चपासून कार्यान्वित झालेल्या लसीकरण टप्प्यातील ६० वर्षे व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी, आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनी १ मार्च रोजी कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा घेतली असल्यास त्यांना २४ मे अथवा ८४ दिवसांनंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.