मुंबईकरांना आता लागली ‘श्रावण सरीं’ची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:02 AM2017-07-25T01:02:58+5:302017-07-25T01:02:58+5:30
नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्म, अशा वैविध्यपूर्ण सणांनी नटलेल्या श्रावण महिन्याचा प्रारंभ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्म, अशा वैविध्यपूर्ण सणांनी नटलेल्या श्रावण महिन्याचा प्रारंभ झाला आहे. संस्कृती प्रतिबिंबित करणारा श्रावण महिना मुंबईकरांच्या उत्साहाला उधाण आणणारा आहे. विशेषत: मागील १५ दिवसांपासून मुंबापुरीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पहिल्याच श्रावणी सोमवाराला पावसाने उसंत घेतली आहे. निसर्गचक्राप्रमाणे आता ‘श्रावण सरी’ मुंबईकरांना ओल्याचिंब करणार आहेत. झोडपणाऱ्या पावसानंतर, आता मुंबईकरांना ‘श्रावण सरीं’ची प्रतीक्षा असणार आहे.
श्रावणातील सोमवाराचे खूप महत्त्व आहे. या दिवशी सकाळी लवकर शंकराची पूजा केली जाते. पूर्ण दिवस उपवास केला जातो. सायंकाळी पूजा करून, गोडाचा नैवेद्य बनवित उपवास सोडला जातो. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा दिवस मोठा सण. या दिवशी महिला नागाची पूजा करतात. पूर्वी महिला वारुळाजवळ जाऊन पूजा करत असत. मात्र, कालांतराने आणि शहरीकरणामुळे वारुळे राहिली नाहीत. परिणामी, आता नागाच्या मूर्तीची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधव साजरा करतात. या दिवशी समुद्राची पूजा केली जाते.
संकष्टी चतुर्थी महत्त्वाची आहे. या दिवशी उपवास करत, श्रीगणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखविला जातो. श्रीकृष्ण जन्म हा रात्री साजरा केला जातो. या दिवशी उपवास केला जातो, तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. एकंदर उत्साहाचे उधाण घेऊन आलेला श्रावण महिना सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करतो.
सुरुवात-शेवटही
सोमवाराने
यंदाच्या श्रावणाचे वैशिष्ट्य म्हणजे, श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारने आणि शेवटही सोमवारनेच होणार आहे. त्यामुळे महादेवाच्या भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुंबईकरांना आता ‘श्रावण सरीं’ची प्रतीक्षा असली, तरीदेखील आत्तापर्यंत झालेल्या पावसाचा आढावा घेतला असता, २३ जुलैपर्यंत शहरात ९७३.३० मिलीमीटर, पूर्व उपनगरात १ हजार २९७.९६ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात १ हजार १३९.६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत कुलाबा येथे २.२ आणि सांताक्रुझ येथे ०.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पडझडीच्या घटना सुरूच असून, शहरात ३, पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ४ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. शहरात ५, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात ११ अशा एकूण २१ ठिकाणी झाडे पडली. शहरात १, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ६ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.