मुंबई : मुंबईकर नागरिकांनी नियम पाळले. स्वतःला सुरक्षित केले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचे प्रमाण कमी करण्यामध्ये महापालिका यशस्वी झाली, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणालया.
कोरोना काळात पेडणेकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया यांच्यातर्फे भायखळा येथील महापौर निवासस्थानी छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापौर बोलत होत्या.
माजी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची कामगिरी, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीसुद्धा संपूर्ण धारावी परिसर पिंजून काढला. त्यामुळे कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे शक्य झाले, असे महापौरांनी सांगितले.
कोरोना काळामध्ये घराबाहेर पडताना नागरिक जेव्हा घाबरत असताना महापौर यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा केली. या कार्याची दखल घेऊन महापौरांचा सन्मान करण्यात आल्याचे वर्ल्ड रेकॉर्डस इंडियातर्फे सांगण्यात आले.