मुंबई : मतदानाबाबतची १५ वर्षांची उदासीनता झटकत मुंबईकरांनी मागील लोकसभा निवडणुकीत ५१.६८ टक्के मतदानाची नोंद केली. हाच ट्रेंड कायम राहणार की मतदानाच्या टक्केवारीबाबत येरे माझ्या मागल्या होणार, या चर्चेला मुंबईकरांनी पूर्णविराम दिला आहे. सलग आलेल्या सुट्ट्या, लगीनसराई आणि तीव्र उन्हाच्या झळा असतानाही २०१४ च्या तुलनेत यंदा साधारण ३.८३ टक्के अधिक मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील मतदानाचा टक्का आर्थिक उदारीकरणाच्या काळात मात्र झपाट्यात घसरत गेला. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून १९९१ पर्यंत मुंबईतील मतांचा टक्का कधीच ५० च्या खाली आला नव्हता. १९६२ ते १९७७ या राजकीय धामधुमीच्या काळात तर मुंबईतील मतांची टक्केवारी ६० च्याही पुढे गेली होती. १९९१ च्या निवडणुकांमध्ये मात्र साधारण ६० टक्के मुंबईकरांनी मतदानाकडे चक्क पाठ फिरवली. त्या वर्षी ४१.६ टक्के इतक्या नीचांकी मतदानाची नोंद झाली. त्यानंतर १९९८ चा ५०.४ टक्क्यांचा अपवाद वगळता सर्व पाच लोकसभा निवडणुकींत मतदानाचा टक्का चाळिशीतच राहिला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मुंबईतील मतांचा टक्का थेट १० टक्क्यांनी वाढला. यूपीए सरकारची १० वर्षे आणि त्या पार्श्वभूमीवर आलेली मोदी लाट, त्याला नवमतदारांची मिळालेली साथ यामुळे देशभर मतदानाचा टक्का वाढला. मुंबईतील वाढ तर १० टक्के इतकी होती. यंदा गेल्या निवडणुकीसारखी स्थिती नव्हती. त्यातच चौथ्या आठवड्यामुळे शनिवार, रविवारची सुट्टी, सोमवारी मतदानानिमित्त मिळणारी सुट्टी यामुळे सलग तीन दिवस सुट्ट्या होत्या. लगीनसराई आणि उन्हाची काहिली पाहता अनेक मुंबईकर पिकनिक आणि बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतील, त्याने पुन्हा एकदा मतांचा टक्का घसरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. जिल्हा प्रशासनानेही सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक मतदार जागृती करण्यावर भर दिला होता.