मुंबईकरांनो, कचऱ्याचे नियोजन करा!
By admin | Published: October 13, 2015 02:29 AM2015-10-13T02:29:21+5:302015-10-13T02:29:21+5:30
जगाच्या तुलनेत भारत विविध क्षेत्रांत प्रगती साधत आहे. अनेक बाबींत आपला देश पुढे आहे. स्वच्छता राखण्यातही आपण पुढे असावे, यासाठी मुंबईकरांनी कचऱ्याचे सुयोग्य नियोजन करून
मुंबई : जगाच्या तुलनेत भारत विविध क्षेत्रांत प्रगती साधत आहे. अनेक बाबींत आपला देश पुढे आहे. स्वच्छता राखण्यातही आपण पुढे असावे, यासाठी मुंबईकरांनी कचऱ्याचे सुयोग्य नियोजन करून ‘स्वच्छ भारत - स्वच्छ मुंबई’ मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
महापालिकेच्या स्वच्छ मुंबई-स्वच्छ भारत अभियानांतर्गत २५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबरदरम्यान आयोजित स्वच्छता मोहीम पंधरवडा समारोप व स्वच्छता अभियान चित्रकला व निबंध स्पर्धा २०१५-१६चा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी विलेपार्ले येथे सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला; या वेळी ते बोलत होते. स्पर्धेत सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील ४८० विद्यार्थ्यांना मिळून एकूण सुमारे २४ लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस स्वरूपात व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
उपमहापौर अलका केरकर म्हणाल्या की, महापालिका नागरिकांसाठी व अधिकाऱ्यांसाठी टप्प्याटप्प्याने ठिकाणे निश्चित करून, एकेक दिवस ठरवून स्वच्छतेची कामे शहरभर करण्यात येत आहेत. मुंबईची रचना व लोकसंख्येची घनता याचा विचार केला तर कचरा व्यवस्थापन करणे आव्हानात्मक आहे. तरीही महापालिका प्रशासन सर्व साधने वापरून कचरामुक्त मुंबई करण्याचा प्रयत्न करत आहे. (प्रतिनिधी)