मुंबई, दि. 30 - मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे रस्तेच नव्हे, तर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक कासवगतीनं सुरु आहे. पावसानं उसंत घेऊन आठ-दहा तास झाल्यानंतरही वाहतुक पूर्वरत झालेली दिसत नाही. मुंबई आणि उपनगरातून मंगळवारी कामाला आलेले चाकरमान्यांना रात्र रेल्वे स्टेशन, मंदिर आणि ऑफिसमध्येच काढावी लागली. सीएसटी, चर्चगेट, दादर, घाटकोपर, कुर्ला यासारख्या स्थानकावर लोकांनी रात्र काढल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे सलग दुसऱ्या दिवशीही हाल सुरुच आहेत. ठाणे- वाशी ट्रान्स हार्बरची वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
तब्बल 12 वर्षांनंतर मंगळवारी पुन्हा पावसाच्या हाहाकारामुळे मुंबई भयकंपित झाली होती. रात्रीनंतर पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी लोकल सेवा पूर्ववत झालेली नाही. पश्चिम रेल्वेवर चर्चगेटवरुन विरारसाठी लोकल ट्रेन रवाना झाली आहे. ह्यपरेह्णवर संथगतीने वाहतूक सुरु असून रेल्वे स्थानकांवर पहाटे पासूनच प्रवाशांची गर्दी झाली आहे. तर मध्य रेल्वेवरील वाहतूक बुधवारी सकाळी सहापर्यंत ठप्प होती. या मार्गावरील वाहतूक कधी सुरु होणार याविषयी कोणतीही माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. एकंदरीतच मंगळवारी मुंबईकरांना झोडपून काढलेला पाऊस बुधवारीही मुंबईकरांना धडकीच भरविणार असल्याचे चित्र आहे.
LIVE UPDATES -
06:57 AM - नवी मुंबई : मुंबईच्या दिशेने येणारी पुणे आणि गोवा महामार्गाची वाहतूक रात्री 12 नंतर सुरु
06:42 AM - मुंबई - रेल्वे स्थानकावर घोषणांचा पाऊस, माटुंगा आणि कुर्ला दरम्यान ट्रॅकवर पाणी आल्याने अप आणि डाऊन गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत!
06:27 AM - मुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा थांबवली, दोन्ही दिशेची वाहतूक अजूनही ठप्प
06:17 AM -मुंबई - सीएसटी ते घाटकोपर रेल्वे वाहतूक अजूनही ठप्प, कल्याणहून येणाऱ्या लोकलही घाटकोपरपर्यंतच
06:17 AM - मुंबई - हार्बर रेल्वे ठप्पच, ठाणे- वाशी ट्रान्स हार्बरची वाहतूक सुरु
06:16 AM - मुंबई - रात्रभर जॅम असलेले पूर्व आणि पश्चिम एक्स्प्रेस हायवे मोकळे
06:16 AM - ठाणे - ठाणे शहरात वीजपुरवठा खंडीत, पावसाचा जोर कायम असल्यानं वीज पुरवठा खंडीत, जवळपास अर्धे ठाणे शहर अंधारात
05:08 AM - मुंबई - 24 तासांनंतर मुंबई लोकलची वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता
04:49 AM - मुंबई - काल झालेल्या धुवांधार पावसामध्ये दोन वृद्ध बेपत्ता
04:46 AM -मुंबई - काल कुर्ला-सायन येथे पावसामुळे अडकलेल्या मध्य रेल्वेमधील प्रवासी सुखरुप घरी पोहचले
02:51 AM - मुंबई - लोअर परेल फिनिक्स मॉलजवळील रघुवंशी इमारतीच्या पहिल्या मजल्याला लागली आग. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल
02:00 AM - मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या पावसावर आणि एकूण परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या कंट्रोल रूममध्ये हजर.
01:54 AM - युनायटेड किंग्डममधील ‘फॉक्स न्यूज’ चॅनलचे प्रसारण स्कायतर्फे थांबविण्यात आले. अल्प श्रोतावर्ग असल्याने ‘२१ सेन्चूरी फॉक्स’ चॅनल व्यवहार्य ठरत नसल्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे रूपर्ट मर्डोक यांनी स्पष्ट केले
01:50 AM - मुंबई - 01.27 वा. दादर ते विरार पश्चिम रेल्वे रवाना करण्यात आली आहे.
01:50 AM -01.10 वा. घाटकोपर ते कल्याण , 00.27 वा. मुंबई सेंट्रल ते विरार, 00.45 वा. बांद्रा ते भाईंदर रेल्वे रवाना करण्यात आलेल्या आहेत.
12:16 AM - ठाण्यात वडिलांच्या हातून चिमुकली निसटली, कोरम मॉल शेजारी नाल्यात बूडू मृत्यू, तर कळव्यात एकाच कुटुंबातील तिघे वाहून गेले
12:10 AM - मुंबई : पावसाच्या विश्रांतीनंतर चर्चगेट-अंधेरी आणि चर्चगेट-विरार लोकल सुरु
10:59 PM - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुंबई विमानतळापासून दहीसरकडे जाणारी वाहतूक कोंडी सुटली
10:51 PM - मुंबई उच्च न्यायालयात जवळपास ५०० लोक अडकले. जेवणासाठी कोर्ट कैन्टिनबाहेर 'स्टाफ'च्या रांगा. कोर्ट प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था