मुंबईकर सुखरुप राहावेत यासाठी प्रार्थना करतो - दिलीप कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 08:50 PM2017-08-29T20:50:32+5:302017-08-29T20:55:51+5:30
मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी ट्विट करत मुंबईकरांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. आपण मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याचंही ते बोलले आहेत
मुंबई, दि. 29 - मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी ट्विट करत मुंबईकरांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. आपण मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याचंही ते बोलले आहेत. दिलीप कुमार यांची तब्येत काही दिवसांपुर्वी बिघडली होती. त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शाहरुख खान त्यांच्या घरी गेला होता.
'घराच्या खिडकीतून पाऊस पाहत आहे. तुमची सुरक्षा आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. देव तुम्हाला सुरक्षित ठेवो. प्रशासन आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे असं मला सांगण्यात आलं आहे', असं ट्विट दिलीप कुमार यांनी केलं आहे. दिलीप कुमार यांच्या ट्विटमुळे त्यांच्याबाबत फिरणा-या अफवांनाही पुर्णविराम मिळाला आहे.
Watching the rains from my window all day. I am praying for your safety and health in this downpour.
— Dilip Kumar (@TheDilipKumar) August 29, 2017
May Allah keep all of you safe. #mumbaiRains. I've been told the authorities are doing their best to make it easy for you. God bless.
— Dilip Kumar (@TheDilipKumar) August 29, 2017
मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास मुंबईकरांच्या मदतीसाठी नौदलाचं हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असून येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महापालिकेने सर्व कर्मचा-यांची सुट्टी रद्द केली असून कामावर हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील पावसाची दखल घेतली असून ट्विट करत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे की, 'महाराष्ट्रातील काही भागात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करेल'. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील ट्विट करत काळजी व्यक्त केली आहे.
मुंबईतील पावसाचा जोर वाढत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'मी महापालिका आपतकालीन विभागाशी चर्चा केली असून मुंबई पोलिसांशी हॉटलाईनवरुन बोललो आहे. मंत्रालयातील कर्मचा-यांना लवकरात लवकर कामावरुन घरी जाण्यास सांगण्यात आल्याचं सांगितलं आहे', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांनी अत्यंत गरजेचं असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे. सोबतच लोकांनी वाहतूक विभागाचा आदेश पाळण्याची विनंतीही केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट किंवा फोन केल्यास पोलीस मदतीला धावून येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबईला पावसाने सकाळपासून झोडपण्यास सुरुवात केली असून पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलै 2005 ची आठवण करुन दिली आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महपालिकेची कंट्रोल रूम सक्रिय असून, पाऊस / शहराशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी १९१६ ला कॉल करा असं आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुंबईकरांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहनही केलं आहे. 'मुंबईतील सर्व पंपिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे, अतिशय आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा', असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. 'मुंबईत गेल्या १ तासामध्ये ५२ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुढील २४ तासांमध्ये अधिक पाऊस अपेक्षित आहे', असंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबई आणि उपनगराला सकाळपासून पावसाने झोडपलं असून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प पडली आहे. दरम्यान मुबईकरांसाठी नेहमी धावणा-या डबेवाल्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डबेवाले जागोजागी अडकुन पडले आहेत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशन प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा आगमन केलेल्या पावसाने आज सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपलं असून मुंबईची तुंबई झाली आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरक्ष: नद्यांचं स्वरुप आलं आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु असून नेहमी धावणा-या मुंबईचा वेग आज कमी झालेला दिसत आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून, कर्मचा-यांना लवकर घरी सोडण्यात आलं आहे.