मुंबई : कोरोनाच्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे आता नागरिकांच्या घरांबाबत असणाऱ्या अपेक्षादेखील बदलल्या आहेत. वर्क फ्रॉम होममुळे नागरिकांना मोठ्या व शांत वातावरणातील घराचे महत्त्व जास्त वाटू लागले आहे. याचसोबत आता मुंबईकरांचा कलदेखील दक्षिण मुंबईत घर घेण्याकडे जास्त दिसून येत आहे.
सीआरई मॅट्रिक्स संस्थेच्या सर्वेक्षण अहवालानुसार, दक्षिण मुंबईत घर खरेदी केलेले सुमारे ३७ टक्के ग्राहक हे मध्य मुंबईतील आहेत. मुंबईतील ग्राहक ऑपेरा हाऊस, गिरगाव, जेकब सर्कल, चिंचपोकळी, मशीद बंदर, माझगाव या दक्षिण मुंबईतील परिसरांमध्ये ग्राहक घर घेण्यास अधिक पसंती दर्शवीत आहेत. यामध्ये लालबाग व दादर परिसरातील ग्राहकांचा समावेश अधिक आहे. तर मुंबईतील घरखरेदीदारांची शिवाजी पार्क, लोअर परळ व लालबाग ही सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत.
मुंबईच्या उपनगरातील घरखरेदीदारांची पूर्व उपनगराला अधिक पसंती मिळत आहे. पूर्व उपनगरातील भांडुप, मुलुंड, पवई, घाटकोपर, चेंबूर या परिसरामधील घरांना नागरिक सर्वाधिक पसंती दर्शवीत आहेत.
मध्य उपनगरातील एकूण २५ टक्के ग्राहक कुर्ला व सायन भागातील आहेत. वांद्रे, चुनाभट्टी, कुर्ला, सायन या भागातदेखील घर खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक इच्छुक आहेत. पश्चिम उपनगरातील घर खरेदीदार चारकोप, कांदिवली व मालाड येथे मोठ्या प्रमाणात घर खरेदी करीत आहेत. यातील २२ टक्के ग्राहक कांदिवली व चारकोप या भागातील आहेत.
कमी गर्दीच्या ठिकाणी घर घेण्याकडे ग्राहकांचा कल
पश्चिम उपनगरामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. तसेच वाहतूक कोंडीची समस्यादेखील जास्त आहे. तुलनेने पूर्व उपनगरामध्ये कमी गर्दी व शांततामय वातावरण असल्याने नागरिक स्वतःचे घर पूर्व उपनगरात घेण्यास इच्छुक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.