मुंबईकरांची खासगी वाहतुकीलाच पसंती, गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहनसंख्येत ७.७ टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:54 AM2018-03-19T04:54:35+5:302018-03-19T04:54:35+5:30
सार्वजनिक वाहन व्यवस्थेच्या वारंवार अपयशामुळे मुंबईकरांनी खासगी वाहतुकीला पसंती दिली आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत वाहनसंख्येत एकूण ७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- महेश चेमटे
मुंबई : सार्वजनिक वाहन व्यवस्थेच्या वारंवार अपयशामुळे मुंबईकरांनी खासगी वाहतुकीला पसंती दिली आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत वाहनसंख्येत एकूण ७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातदेखील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने, राज्यातील वाहनसंख्येत ७.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नागरिकांकडून खासगी वाहतुकीला पसंती असल्याचे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी २०१७-१८ या अहवालातील आकड्यांवरून स्पष्ट होते.
केंद्र सरकारतर्फे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण गोष्टींचा स्वीकार केल्यास, त्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक सेवांच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्याकडून केंद्राच्या धोरणाला खो मिळत आहे.
बेस्ट आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाकडे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी आहे. मात्र, एसटी
आणि बेस्ट दोन्ही सार्वजनिक सेवा प्रवाशांना ‘आकर्षित’ करण्यास अपयशी ठरत आहेत. यामुळे मुंबईकरांनी खासगी वाहतुकीला प्राधान्य देत, वाहन खरेदीकडे मोर्चा वळविला. २०१७ मध्ये मुंबईतील वाहनांची संख्या २९ लाख ५० हजार होती. जानेवारी २०१८ पर्यंत हाच आकडा ३१ लाख ७९ हजारांच्या घरात पोहोचला आहे. यापैकी राज्यात १ जानेवारी २०१८ रोजी एकूण ३.१४ कोटी मोटार वाहने वापरात आहेत. दर लोकसंख्येमागे २५ हजार ८५९ वाहने वापरात होती. यापैकी सुमारे ७.७ टक्के वाहने केवळ मुंबईत आहेत. २०१७च्या तुलनेत २०१८ मध्ये दुचाकींमध्ये ८.६ टक्के, आॅटो रिक्षांमध्ये ११.२ टक्के आणि हलकी मोटार वाहने (कार, जीप) यात ६.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
>वापरात असलेल्या मोटार वाहनांची संख्या (लाखांमध्ये)
महाराष्ट्र मुंबई
प्रकार २०१७ २०१८ २०१७ २०१८
दुचाकी २१,३९०.३ २३,००७.८ १,७४०.६ १,८८९.९
आॅटो रिक्षा ७२०.४ ७४७.३ १२५.५ १३९.६
हलकी वाहने ४,४४६.० ४,८१०.२ १,०१९.७ १,०८१.८
माल मोटारी १,४७५.९ १,५८२.८ ५०.८ ५१.७
ट्रॅक्टर्स ६१६.२ ६५१.१ ०.२ ०.२
ट्रेलर्स ३४८.६ ४०९.४ ०.१ ०.१
रुग्णवाहिका १२.७ १५.० १.२ १.३
अन्य वाहने ५३.७ ६१.८ १.३ १.४
एकूण २१,१८५.९ ३१,४१५.० २,९५०.८ ३,१७९.०