मुंबई : पावसाळा तोंडावर आला आहे. सध्या मुंबईत आभाळच दिसत असून, अधूनमधून सूर्यनारायणाचे दर्शन होत आहे. मान्सून दूरदेशी असला तरीही मुंबईत जलजन्य आजार डोके वर काढू लागले असून, मुंबईकरांनो येतोय पावसाळा, तब्येत सांभाळा असे म्हणण्याची वेळ मुंबई महानगरपालिकेवर आली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गॅस्ट्रोचे ७८ रुग्ण आढळले असून, सर्वाधिक रुग्ण एच ईस्ट, एच वेस्ट आणि ई वॉर्डमध्ये नोंदले गेले आहेत, तर मलेरियाचे ५७ रुग्ण नोंदले गेले असून, सर्वाधिक रुग्णांची नोंद जी/एस व ई वॉर्डमध्ये झाली आहे.
जलजन्य आजारांबाबत सातत्यपूर्ण जनजागृती केली जाते. यात सातत्याने हात धुणे, उघड्यावरचे अन्न न खाणे कटाक्षाने शुद्ध पाणी पिणे यांचा समावेश असतो. गॅस्ट्रो रुग्णांची संख्या पाहता जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या ११ महिन्यांच्या कालावधीदरम्यान ७ हजार २४७ रुग्ण आढळून आले होते. जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान २ हजार ३१६ रुग्ण आढळून आले. गॅस्ट्रो रुग्णसंख्या ही जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ यादरम्यान १० हजार २५७ होती. याच ११ महिन्यांच्या कालावधीसाठी सदर रुग्णसंख्या २०१६ मध्ये ९ हजार ४६२, वर्ष २०१७ मध्ये ७ हजार ९११, २०१८ मध्ये ७ हजार ३१५ एवढी नोंदविण्यात आली होती.
आजारापासून संरक्षण करायचे असेल तर...१) पाणी उकळून थंड करून पिणे२) भाजलेले व हलके पदार्थ खाणे४) पावसाळ्यात पचनक्रिया मंदावलेली असल्याने अति तेलकट, पचण्याला जड असलेल्या पदार्थांचे सेवन करू नये.५) दमट वातावरणामुळे आपण हिवाळा व उन्हाळ्यासारखा आहार घेऊ शकत नाही, घेतला तर तो रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीला मानवत नाही.
डास चावू नयेत, म्हणून...- मच्छरदाण्यांचा वापर करणे- लहान मुलांना अंगभरून कपडे घालणे- काळजी घेतल्यास डासांमुळे होणारे डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यासारखे आजार होणार नाहीत.- आजारी व्यक्ती, वृद्ध माणसे, गरोदर महिला, एक वर्षाच्या आतील बालके यांनी पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे.
हे करा... - पावसाळ्यामध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते.- ती टाळण्याकरिता घराच्या परिसरातील पाणी वाहते ठेवावे.- घरातील उघड्या पाणीसाठ्यांवर झाकण ठेवावे व हे पाणी दर ८ दिवसाला बदलावे.- शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा.
डासांची निर्मिती घरातील कुंड्या, कूलर्स यामधील पाणी नियमित बदलावे. छतावर, तसेच घराच्या परिसरात फुटके डब्बे, नारळाच्या करवंट्या, मातीचे बोळके, मडके, गाड्यांचे खराब टायर्स व निरुपयोगी वस्तू नष्ट करण्यात याव्यात, जेणे करून डासांची निर्मिती होणार नाही.
पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे विविध जलजन्य आजार उद्भवतात. पावसाचे पाणी पावसाळ्यात ठिकठिकाणी साचते, तसेच नदीपात्रात प्लास्टिकसारखा कचरा साचून राहिल्याने हे पाणी वाहते नसल्याने ते दूषित होते आणि त्यापासून डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, कावीळ, गॅस्ट्रो, उलट्या, जुलाब, सर्दी, टायफाॅइड, अतिसार यासारखे जलजन्य आजार होतात.