नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर तयार; माॅलमध्ये आकर्षक सवलतींसह रोषणाई, चौपाट्यांवर गर्दी

By स्नेहा मोरे | Published: December 30, 2023 09:44 PM2023-12-30T21:44:30+5:302023-12-30T21:44:52+5:30

यंदा पार्ट्यांमध्ये ‘डाॅल्बीवाल्या’, ‘जमाल कुडु’वर थिरकणार तरुणाई

Mumbaikars ready to welcome New Year; Illumination with attractive discounts in the malls, crowds on the square | नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर तयार; माॅलमध्ये आकर्षक सवलतींसह रोषणाई, चौपाट्यांवर गर्दी

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर तयार; माॅलमध्ये आकर्षक सवलतींसह रोषणाई, चौपाट्यांवर गर्दी

मुंबई- यंदा ‘नवीन वर्ष आणि वीकेण्ड’ असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने मागील आठवड्यापासून याच गोष्टीची चर्चा आहे. काय मग प्लॅन झाला का? यंदा कुठे सेलिब्रेशन? या आणि अशा अनेक प्रश्नांवर अखेर मुंबईकरांनी उत्तरे दिली. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी जोरदार तयारी केली असून अनेकांनी शहराजवळच्या पर्यटन स्थळांकडे कूच केली आहे, तर अनेकांनी आपल्या गँगसोबत हाॅटेल्स, पब्समध्ये सेलिब्रेशनचा बेत केला आहे.

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने सुट्टी न मिळालेल्या मुंबईकरांनी सायंकाळनंतर गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नरिमन पाॅईंट, जुहू, बँडस्टँड अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा प्लॅन केला आहे. यावेळी, फटाक्यांची आतिषबाजी, लाऊडस्पीकरवरील गाण्यांचा माहोल, उधाणलेला समुद्र आणि एकत्र जमलेले मुंबईकर ही सेलिब्रेशनची आगळीवेगळी रीत चांगलीच रुजली आहे.

नववर्ष स्वागतासाठी अनेकांनी मुंबईबाहेर जाण्याचे बेत आखले आहेत. शेवटच्या क्षणी बुकिंगसाठी धडपडणाऱ्या मंडळींच्या पदरी निराशा पडत आहे. शहर उपनगरातील माॅल्समध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतींची खैरात केली आहे. आणि बच्चेकंपनीचे मन जिंकण्यासाठी आकर्षक रोषणाईही केली दिसून येत आहे. यंदाच्या थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये अगदी मोठ्या पाटर्यांपासून ते अगदी हाऊस पार्ट्यांमध्ये ‘डाॅल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला’ आणि ‘जमाल कुडु’ या गाण्यावर तरुणाईसह सर्वच मंडळी थिरकताना दिसून येणार आहे.

भूर्रर्रर्रर्रर्र चले हम!

नववर्षांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची राज्यभरातील जवळपास सर्वच रिसॉर्ट पुढील काही दिवसांसाठी फुल्ल आहेत. याशिवाय महाबळेश्वर, माळशेज, शिर्डी, भंडारद्वार आदी ठिकाणच्या रिसॉर्टचीही परिस्थिती काही वेगळी नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बुकिंग चांगले असल्याचे सांगून पर्यटकांसाठी विविध पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुंबईजवळील मुरूड, अलिबाग, हर्णे, दापोली, दिवेआगार, माथेरान, लोणावळा, पाचगणी, इगतपुरी, बोर्डी, डहाणू इत्यादी ठिकाणांकडे मुंबईकरांचा मोठा ओढा आहे.

हॉटेल, पबही सज्ज !

न्यू इयरसाठी तरुणाईचा वाढता ओढा पाहता हाॅटेल्स, क्लब्स, पबही त्यांच्या सेवेत सज्ज झाले आहेत. मात्र या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी युगुलांना सुमारे २००० रुपये मोजावे लागणार आहेत. तर एकट्याच्या प्रवेशासाठी १५०० रुपये माजावे लागणार आहेत. थर्टी फर्स्टला रविवार असूनही सुट्टी न मिळालेल्यांना मुंबईबाहेर जाणे सर्वानाच शक्य नसल्याने मुंबईतच थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला आहे. ही मेख ओळखून पब आणि हॉटेल्सही सज्ज झाले आहेत.

तीर्थक्षेत्रेही फुलली

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागताला देवदर्शन घेण्यासाठी बरेच जण घराबाहेर पडले आहेत. शिर्डी, सप्तशृंगी, अष्टविनायकांची ठिकाणं अशा ठिकाणी गर्दी वाढते आहे. नवीन वर्ष आनंददायी जावे यासाठी परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक जण जातायेत. तर मुंबईकर ही सिद्धिविनायक, महालक्ष्मी, हाजीअली, कुलाबा - माहीम चर्च या प्रार्थना स्थळांना भेटी देतात.

Web Title: Mumbaikars ready to welcome New Year; Illumination with attractive discounts in the malls, crowds on the square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.