Join us

मुंबईकरांना ‘हॉर्न फ्लू’चा धोका!

By admin | Published: March 08, 2016 2:47 AM

शहर आणि उपनगरात वाहतूककोंडीतून वाट काढण्यासाठी अनेक जण ‘कर्कश हॉर्न’ सतत वाजवत राहतात. या कर्कश हॉर्नमुळे अन्य आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

मुंबई: शहर आणि उपनगरात वाहतूककोंडीतून वाट काढण्यासाठी अनेक जण ‘कर्कश हॉर्न’ सतत वाजवत राहतात. या कर्कश हॉर्नमुळे अन्य आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. याविषयी जनजागृती करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि आवाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘# हॉर्न फ्लू’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतूककोंडी, वाहतुकीचे नियम, वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि आरोग्याच्या समस्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ‘गेट वेल सून मुंबई’ कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे. या कॅम्पेन अंतर्गत ‘# हॉर्न फ्लू’ या मोहिमेची सुरुवात ६ मार्च रोजी दिल्ली येथे करण्यात आली. या मोहिमेत पहिल्यांदा सोशल नेटवर्किंग साइटवरून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आवाज फाउंडेशनच्या संस्थापिका सुमेरा अब्दुल अली यांनी दिली. हॉर्नच्या आवाजाचे डेसिबल खूप असते. त्यामुळे कानाबरोबरच शरीराच्या इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. रोजच्या रोज वाहतूककोंडीतून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना याचा अधिक परिणाम भोगावा लागत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कर्कश आवाजामुळे हृदयविकार होण्याचा धोका आहे. प्रमाण वाढल्यास मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊन, मानसिक संतुलन ढासळू शकते. काही वेळा कर्करोग होण्याचा धोकाही असतो. कर्कश आवाजाचा सर्वाधिक परिणाम हा मेंदूवर होतो. ६० ते ७० डेसिबल आवाज दीर्घकाळ कानावर पडत असेल, तर ऐकण्याची क्षमता कमी होते. अथवा वृद्धापकाळात ऐकण्याची क्षमता कमी होते. रक्तदाबावरही आवाजाचा परिणाम होतो. संपूर्ण शरीरावर परिणाम होत असल्याने कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे आयएमएचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. जॉन पाणेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)