खड्डे बुजवा, पाणी नाही, अस्वच्छ स्वच्छतागृहे...; मुंबईकरांची पालकमंत्र्यांकडे धाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:33 PM2023-08-16T12:33:36+5:302023-08-16T12:34:39+5:30
प्रशासनाला प्रत्येक तक्रारींची जातीने दखल घ्यावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डेब्रिज पडलेय, खड्डे पडले आहेत, पाणी येत नाही, स्वच्छतागृहे अस्वच्छ आहेत, इमारत धोकादायक झाली आहे, पार्किंगसाठी जागा नाही, उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक हवेत, उद्यानात मुलांना खेळण्यासाठी चांगली खेळणी हवी, रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत अशा बऱ्याच तक्रारी मुंबईकरांनी पालकमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मुंबईकर आपली तक्रार थेट पालकमंत्र्यांकडे नोंदवत असून या तक्रारींचे निवारण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत असल्याने प्रशासनाला प्रत्येक तक्रारींची जातीने दखल घ्यावी लागत आहे.
मुंबईतील पालिका मुख्यालयात शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटातील राड्यामुळे पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी शिवसेनेसह सर्वच पक्ष कार्यालयांना टाळे ठोकले आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांना पालिकेबाहेरूनच काम करावे लागत आहे. असे असताना मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी पहिल्या मजल्यावरील बाजार आणि उद्यान समितीच्या कार्यालयात नागरिक कक्ष कार्यालय सुरू केले आहे. लोढा आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी ४ ते ६ या वेळात कार्यालयात उपलब्ध राहत असून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत.
तर पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीत या कार्यालयात दोन सत्रांमध्ये बसण्याची जबाबदारी भाजपच्या माजी नगरसेवकांवर टाकली आहे. या वेळात नागरिक पालकमंत्र्यांच्या कार्यालयात आपल्या दैनंदिन समस्या मांडत असून समन्वय साधण्यासाठी सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नेमणूक केली आहे.
ही आहेत मुंबईकरांची गाऱ्हाणी
हे कार्यालय सुरू झाल्यापासून ४०० पेक्षा अधिक लोकांनी पालिकेकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.