मुंबईकर म्हणतात, आम्ही कर स्वरूपात भरलेले पैसे पाण्यात, पालिकेला मुंबई तुंबण्याच्या समस्येवर उपाय का सापडत नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:35 AM2020-09-25T01:35:24+5:302020-09-25T01:35:29+5:30
नागरिकांनी संपूर्णपणे पालिकेवर अवलंबून न राहता आपला परिसर प्लास्टिकमुक्त करावा, असे काही मुंबईकरांचे म्हणणे आहे.
ओमकार गावंड।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बुधवारी जोरदार बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या मनात भीती निर्माण झाली होती. दरवर्षी मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय होते. मात्र यासाठी पालिकेकडे कायमस्वरूपी उपाय का नाही? आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो, मात्र तरीही आमच्या वाट्याला तुंबलेली मुंबईच का येते? असा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित होत आहे. तर नागरिकांनी संपूर्णपणे पालिकेवर अवलंबून न राहता आपला परिसर प्लास्टिकमुक्त करावा, असे काही मुंबईकरांचे म्हणणे आहे.
एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही शासनाला कर देतो. मात्र आम्हाला त्याबदल्यात योग्य सुविधा मिळत नाहीत. दरवर्षीपेक्षा यावर्षी दुपटीने पाणी तुंबाण्याच्या घटना घडल्या आहेत. वडाळा गांधी मार्केट किंग्ज सर्कल येथे पालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते, मात्र तरीही तिथे पाणी साचते. या परिसरात रस्त्यालगत अनेक विद्युतपेट्या आहेत. एखाद्या वेळेस या विद्युतपेटीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यास अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. पालिका येथून त्या विद्युतपेट्या दुसरीकडे हलवत नाही. - चिराग शहा, वडाळा
पावसाळ्याच्या आधी मुंबईतील सर्व ठिकाणी नालेसफाई होणे गरजेचे आहे. पालिका नालेसफाईचे कंत्राट एखाद्या कंत्राटदाराला देते, मात्र तेथे देखरेखीसाठी निरीक्षक न नेमल्याने ते काम चांगल्या पद्धतीने होत नाही. मुंबई तुंबाण्यामागे जेवढी पालिका जबाबदार आहे, तेवढेच सामान्य नागरिक देखील जबाबदार आहेत. आजही अनेक लोक प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर टाकतात. मुंबईकरांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून आपल्या आजूबाजूच्या परिसरात प्लास्टिक न टाकल्यास पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ शकेल. - मुश्ताक अन्यारी, माहीम
पंपिंग स्टेशन चालविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शिफ्ट पूर्वीप्रमाणेच आहेत. ते योग्य क्षमतेने चालविण्यासाठी शिफ्ट वाढवायला हव्यात. रात्रीच्या वेळेस मुसळधार पाऊस पडल्यास पंपिंग स्टेशन सुरू नसल्याने पाणी साचून राहते. ते पंपिंग स्टेशन सुरू होण्यासाठी सकाळ होण्याची वाट बघावी लागते.पंपिंग स्टेशन देखभालीसाठी अनेक दिवस बंद ठेवत असल्याने काही वेळेस नाल्याचे पाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट समुद्रात सोडले जाते. पालिका पाणी साचण्याच्या समस्येबाबत अत्यंत उदासीन असल्याने पूर्व उपनगरातील नागरिकांना पाणी तुंबण्याचा फटका बसतो.
- रवी नाईक, मुलुंड
बुधवारच्या पावसात माझी स्वत:ची चारचाकी गाडी अनेक तास पावसात बुडाली होती. तिला दुरुस्त करण्यासाठी मला हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरून त्यांच्या अनेक महत्त्वाच्या वस्तू भिजल्या आहेत. या सर्व गोष्टींना पालिका जबाबदार आहे. मुंबईत सुरू असलेल्या कोस्टल रोड सारख्या विविध प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबई शहर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यासाठी शासनाने वेळीच उपाययोजना करून ठेवायला हव्यात.
- सुजीत तळेकर, चेंबूर
कधी नव्हे ते दक्षिण मुंबईत पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. लोअर परळ, हिंदमाता, माटुंगा व सायन या परिसरांमध्ये दरवर्षी पाणी साचते, मात्र पालिका यावर कायमस्वरूपी उपाय का शोधत नाही? उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाय करायला हवा. पाइप साफ न केल्याने तसेच त्यांची देखभाल न केल्याने जे.जे. उड्डाणपुलावरही बुधवारी पाणी साचले होते. अनेक ठिकाणी नव्याने पाणी साचल्यामुळे तेथे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपही नव्हते. काही परिसरांमध्ये गुरुवारीही पाण्याचा निचरा झाला नव्हता. पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे.
- विकास सकपाळ, रहिवासी, काळाचौकी