पुन्हा धडकी भरली; मुंबई तुंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 01:10 AM2020-09-24T01:10:50+5:302020-09-24T01:11:24+5:30

पावसाचे पाणी चाळींसह इमारतींमध्ये शिरले रहिवाशांचे झाले मोठे आर्थिक नुकसान

Mumbaikars shocked again; | पुन्हा धडकी भरली; मुंबई तुंबली

पुन्हा धडकी भरली; मुंबई तुंबली

Next

मुंबई : एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाऊस; अशा दुहेरी संकटात मुंबईकर सापडला आहे. मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने आपला मारा कायम ठेवल्याने बुधवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार ते मध्यम स्वरूपात कोसळलेल्या पावसामुळे पाण्याचा निचराही होत नव्हता. विशेषत: ग्रँट रोड येथील स्टेशन लगतची वस्ती, मुंबई सेंट्रल येथील परिसरात, वरळी येथील महापालिका कर्मचाऱ्यांची वस्ती, चिंचपोकळी परिसरात साठलेल्या पावसाच्या पाण्याने रौद्र स्वरूप धारण केले होते. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहने अर्धी बुडाली होती. तळमजल्यावरील बहुतांश रहिवाशांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे अबालवृद्धांची दैना उडाली होती.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता आणि गांधी मार्केट परिसरात तुंबलेल्या पावसाच्या पाण्याने तर हा मार्गच बंद झाला होता.
येथून प्रवास करणारी वाहने अर्धेअधिक पाण्याखाली जात होती. लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, कल्पना सिनेमा, शीतल सिग्नल आणि कमानी जंक्शन येथे गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाहने आणि चाकरमानी वाट काढत होते. या पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याने हेच पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरत होते आणि रहिवासी वस्त्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र होते. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने येथील पाण्याचा बºयापैकी निचरा झाला होता. मात्र दुपारी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आणि पुन्हा याच परिसरात पाणी साचते की काय, याची धडकी मुंबईकरांना लागून राहिली.


चिंचपोकळी येथे रस्त्यांवर, सायन परिसरात गुडघ्याएवढे, सायनमध्ये किंग्ज सर्कलमध्ये पाणी साचले होते. मुंबई सेंट्रल येथील आगारात पाणी साचले होते. येथे गेल्या ३५ वर्षांत एवढे पाणी कधी साचले नव्हते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. लोअर परळ येथील बीडीडी चाळ, वरळी येथील डिलाईल रोड परिसर, शिवडी बीडीडी चाळ परिसर, महालक्ष्मीमधील वस्तीलगत आणि ग्रँट रोड रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रेल्वे स्थानकांचा विचार करता दुसरीकडे मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात पाणी साचले होते. येथे बच्चे कंपनी पावसात भिजत आनंद लुटत होती. कुर्ला रेल्वे स्थानक, सायन रेल्वे स्थानक परिसरातही फार काही वेगळी परिस्थिती नव्हती.

मंगळवार रात्रीसह बुधवारी दिवसभर झालेल्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने मुंबईकरांना जोरदार दणका दिला. विशेषत: दक्षिण आणि मध्य मुंबईतील बहुतांश विशेषत: बीडीडी चाळीतील तळमजल्यांवरील घरांत पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. वरळी, लोअर परळ येथील चाळींमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी शिरले असतानाच पूर्व व पश्चिम उपनगरातील इमारतींच्या तळमजल्यावर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनाही पूरसदृश पाण्याचा सामना करावा लागला. बुधवारची संध्याकाळ उजाडली तरीही पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. पावसाने मुंबईकरांना धडकीच भरविली होती.

Web Title: Mumbaikars shocked again;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.