जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि पुढील महिन्यात कुठेतरी विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरंतर, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) मान्सून आकस्मिक योजनेअंतर्गत (Monsoon Contingency Plan), दोन्ही धावपट्टी-RWY ०९/२७ आणि १४/३२ मान्सूनपूर्व देखभालीसाठी तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान, तेथे दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे.
२ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत देखभालीच्या कामासाठी या धावपट्ट्या बंद राहतील. २ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होईल. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि कामकाजात सातत्य राखण्यासाठी दरवर्षी धावपट्टी तात्पुरती बंद करून दुरुस्तीचं काम हाती घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक आहे आणि दररोज सुमारे ९०० उड्डाणं हाताळली जातात. विमानतळावर धावपट्टी, टॅक्सीवे आणि ऍप्रनचे जाळे सुमारे १,०३३ एकरमध्ये पसरलेलं आहे.
देखभालीचे काम हा विमानतळाच्या पावसाळी आकस्मिक योजनेचा एक भाग आहे, जो पावसाळ्यात शहरातील खराब हवामानामुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही संभाव्य समस्या कमी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीएसएमआयएनं विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांसह अनेक भागधारकांच्या सहकार्यानं धावपट्टीच्या देखभालीची योजना आखली आहे.